-प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : पेन्शनरांचे शहर अशी ओळख असलेले पुणे शहर आता तरुणाईचे ‘कॉस्मोपोलिटन’ शहर ठरले आहे. त्यामुळेच जगभरातील खाद्यभ्रमंतीची झलक शहरात पाहायला मिळते. आधुनिकतेचे रुपडे आपलेसे केलेल्या शहराने आता चहाप्रमाणेच कॉफीलाही आपलेसे केले आहे. त्यामुळेच ‘अमृततुल्य’च्या बरोबरीने आता पुण्यातील रस्ते ‘स्ट्रीट कॅफे’ अर्थात टपरीवजा कॉफी शॉप्सने सजले आहेत. आलिशान कॉफी हाऊसमधील कॉफीचे सर्व महागडे प्रकार या ‘स्ट्रीट कॅफे’मध्ये तरुणाईला परवडेल अशा किमतीत उपलब्ध झाले आहेत.
शहरातल्या कोणत्याही मुख्य रस्त्यांवरून चक्कर मारली की विविध कल्पना वापरून सजवलेले ‘कॅफे’ लक्ष वेधून घेतात. पुण्यामध्ये विविध राज्यांतून, देशांमधून अनेक नागरिक शिक्षण, नोकरीसाठी स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे विविध ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीचा मिलाप शहरात एकसंध झालेला दिसून येत आहे. पुण्यातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, साळुंखे विहार, एनआयबीएम रस्ता, घोले रस्ता, प्रभात रस्ता अशा ठिकाणी थाटलेले स्ट्रीट कॅफे तरुणाईच्या गर्दीने फुललेले दिसून येत आहेत. अगदी ९० रुपयांपासून २००-२५० रुपयांपर्यंतचे कॉफीचे विविध प्रकार तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.
एकीकडे शहरातील चहाने ‘अमृततुल्य’ ते ‘कॉर्पोेरेट दुकाने’ हा प्रवास पार केला आहे. दुसरीकडे, चहाप्रेमींच्या बरोबरीने कॉफीप्रेमींची संख्या बहरु लागली आहे. कॉफी हे इन्स्टंट एनर्जी बुस्टर मानले जाते. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी कॉफी आपला उत्साह वाढवते. त्यामुळेच कॉफीची लोकप्रियता गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड वाढली आहे. हिवाळ्यात हॉट कॉफी, तर उन्हाळ्यात कोल्ड कॉफीला प्रचंड मागणी वाढली आहे. त्यातही वैविध्य उपलब्ध करून दिल्यामुळे कॉफीची टेस्ट ‘डेव्हलप’ होण्यास मदत झाली आहे.
काय आहे कॉफीतील वैैविध्य?
एक्सप्रेसो
कॅफे लॅटे
अमेरिकानो
कॅप्युचिनो
कॅफे फ्रॅपे
कॅरेमल फ्रॅपे
आयरिश कॉफी
कॅफे मोका
हॉट चॉकलेट
हॅझलनट
तिरामिसू
कॅफे कॉफी डे, स्टार बक्स, बरिस्ता, कॉफी नेशन यांसारख्या चेनमुळे कॉफीच्या चाहत्यांमध्ये गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली. ‘कामाशिवाय जास्त वेळ येथे बसू नये’ ही खास पुणेरी हॉटेलमधील संकल्पना कॉफी शॉप्सनी मोडीत काढली. एखादी कॉफी ऑर्डर करून तुम्ही अगदी तीन-चार तासही कॉफी शॉपमध्ये निवांत वेळ घालवू शकता, ही संकल्पना पसंतीस पडली, रुजली आणि फोफावली; मात्र कॉफी शॉप्समधील कॉफीची किंमत ३०० रुपयांपासून सुरू होते. प्रत्येकाला एवढा खर्च परवडेल, असे नाही. म्हणूनच काहीशा कमी किमतीत कॉफीतील तेच वैैविध्य उपलब्ध करून देणारे ‘स्ट्रीट कॅफे’ गेल्या वर्षभरात आमचे अड्डे बनले आहेत. स्ट्रीट कॅफेमध्ये हॉट कॉफी, कोल्ड कॉफी यांच्यातील वैैविध्यासह आईस टी, मोईटो, लिमोनाड, लगून, शेक्स असे वैैविध्य पाहायला मिळत आहे.
- शरयू देशपांडे, तरुणी
कोरोना काळानंतर पुण्यात स्ट्रीट कॅफे थाटला. मुंबईतील कॅफेची फ्रँचाईझी पुण्यात चालवायला घेतली. कोरोनानंतर अशी नवी संकल्पना पुणेकर स्वीकारतील की नाही, अशी शंका होती; मात्र स्ट्रीट कॅफेला तरुणाईकडून प्रचंड पसंती मिळत आहे. कॉफीचे देशी, परदेशी प्रकार त्यांच्या खिशाला परवडतील आणि चवीशी कोणतीही तडजोड करावी लागणार नाही, असा आमचा प्रयत्न असतो. दररोज १०० हून अधिक ग्राहक कॉफी तसेच इतर पेये पिण्यासाठी येतात. दररोज संध्याकाळी आणि वीकेंडला जास्त गर्दी असते. सध्या कॉफी शॉपवर चार कर्मचारी आहेत.
- स्ट्रीट कॅफे चालक