पुणे : वणवा लागला की, सर्व काही जळून जाते; पण शिल्लक राहिलेल्या राखेतूनही पुन्हा फुलणारी अनोखी वनस्पती तळेगाव दाभाडेजवळच्या गवताळ कुरणांमध्ये आढळली आहे. ‘डिक्लीपटेरा पॉलीमॉर्फा’ असे तिचे शास्त्रीय नाव आहे. तळेगावस्थित वनस्पती अभ्यासक आदित्य धारप आणि पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेमधील डॉ. मंदार दातार, भूषण शिगवण यांनी ही वनस्पती शोधली आहे. यावरचा रिसर्च पेपर इंग्लंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘क्यू बुलेटिन’ नावाच्या संशोधन नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला.
फुलण्यासाठी आगच वरदान, त्यातून हाेताे बीजप्रसार- ‘डिक्लीपटेरा पॉलीमॉर्फा’ ही वनस्पती आगीशी सामना करून जिवंत राहणाऱ्या काही निवडक वनस्पतींपैकी आहे. इंग्रजीत या वैशिष्ट्याला ‘पायरोफायटिक’ असे म्हणतात. - आफ्रिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या गवताळ प्रदेशात आगीनंतर फुलोऱ्यावर येणाऱ्या अनेक वनस्पती आढळतात. मात्र, भारतात नाही. - ‘पायरोफायटिक’ प्रकारातल्या या वनस्पती फुलण्यासाठी किंवा बीजप्रसारासाठी पूर्णपणे आगीवर अवलंबून असतात. - मात्र ‘डिक्लीपटेरा’ फुलण्यासाठी आगीनंतरच्या परिस्थितीचा स्वतःसाठी फायदा करून घेते.
भारतात आढळणाऱ्या ‘डिक्लीपटेरा’च्या कुठल्याच प्रजातीत अशा प्रकारचे दोनदा फुलणे नोंदले गेलेले नाही. मात्र, आफ्रिकेतल्या काही ‘डिक्लीपटेरा’च्या दोन-तीन जाती मात्र आगीनंतर फुलतात. त्यांच्याशी नाते सांगणारी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती ठरते.- मंदार दातार, ज्येष्ठ संशोधक, आघारकर संशोधन संस्था.
लंडनच्या क्यू बॉटॅनिक गार्डन, येथील वनस्पती तज्ज्ञ डॉ. आयेन डर्बिशायर यांनीही या वनस्पतीच्या नवेपणाला दुजोरा दिला.