पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांमुळे पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या ५०० ई-बसला आणखी विलंब होणार आहे. हैदराबाद येथून चाचणीसाठी एक बस पुण्यात दाखल झाली आहे. मात्र, ह्या परिस्थितीत चाचणी घेणे शक्य नसल्याने याचा थेट परिणाम गाडीच्या उत्पादनावर होणार आहे. परिणामी, नव्या बससाठी पुणेकरांना वाट पाहावी लागणार आहे.
पुणेकरांचा शहरांतर्गत प्रवास अधिक सुसह्य व्हावा, याकरिता पीएमपी ५०० नवे ई-बस घेत आहेत. यातील ३५० बस ह्या केंद्र शासनाच्या फेम २ या योजनेतील आहेत. तर, उर्वरित १५० बस पुणे महापालिका उपलब्ध करून देत आहे. हैदराबाद येथील इलेक्ट्रा नावाची कंपनी ह्या बसचे उत्पादन करीत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात यातील ७५ बस पीएमपीला मिळणार होते. मात्र, त्याची चाचणी रखडली असल्याने त्याचा पुरवठा होण्यास विलंब होणार आहे. सप्टेंबर महिन्यात बसची पहिली खेप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बसेस १२ मीटर लांबीचे असून एका बसची किंमत १ कोटी ९५ लाख इतकी आहे.
नव्या डेपोच्या कामांना देखील विलंब :
पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या ५०० नव्या इलेक्ट्रिक बससाठी सहा नवे डेपो बांधले जातील. याच्या कामास आता सुरुवात होणे अपेक्षित होते.मात्र कडक निर्बंधांमुळे त्याला देखील विलंब होणार आहे. जून महिन्यापासून नव्या डेपोचे काम सुरू होईल, अशी शक्यता आहे. एका डेपोसाठी सात कोटी रुपयांचे खर्च अपेक्षित आहे. नव्या डेपोत मुळशी, हिंजवडी, भोसरी, वाघोली, सरोळी व पुणे स्टेशनचा समावेश आहे. पुणे स्टेशनचे संपूर्ण पणे नूतनीकरण करून त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे.
---------------
चाचणीसाठी एक बस पीएमपीकडे आली आहे. मात्र, कडक निर्बंधामुळे सद्यस्थितीत त्याची चाचणी घेणे शक्य नाही. त्याचा परिणाम उत्पादन व पुरवठ्यावर होणार आहे. यासह डेपोच्या कामांना देखील विलंब लागणार आहे.
- डॉ. चेतना केरूरे , सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
------------