लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले शुक्रवारी (दि.१६) पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या नव्या शीघ्र कविता ऐकवल्या.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीपण्णी करताना आठवले म्हणाले, “जब तक है केंद्र मे नरेंद्र मोदी, तब तक कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी.’ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मात्र आठवले यांनी कौतुक केले. पटोलेंचे वर्णन करताना आठवले म्हणाले, “जे रोज देतात इतरांना टोले, त्यांना म्हणतात नाना पटोले.”
कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आठवले यांनी दिलेल्या ‘गो कोरोना...’ची खूप चर्चा झाली. त्यात बदल करून आठवले यांनी नवी घोषणा दिली. ते म्हणाले, “मी ‘गो कोरोना’चा नारा दिला. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता ‘नो कोरोना, नो कोरोना’चा नारा मी देत आहे.” पुढे त्यांनी ‘जरी आली कोरोनाची तिसरी लाट, तर आम्ही लावू त्याची वाट,’ अशीही कविता केली.
चौकट
रामदास आठवले म्हणतात...
-पालिका हद्दीत २३ गावांचा समावेश केल्याने शहराचे क्षेत्र वाढले. त्याऐवजी दुसरी महापालिका करावी. राज्य सरकारने पुण्यासाठी साडेचार एफएसआय द्यावा. जेणेकरून बिल्डर एसआरएसाठी पुढे येतील आणि झोपडपट्टी धारकांना फायदा मिळेल.
-पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करू नये. देशातील सर्व जाती धर्मांचा विचार करून मंत्रिमंडळात नेत्यांना स्थान दिले गेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा नंबर लागला नाही. पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नाही.
-एल्गार परिषद व भीमा कोरेगाव दंगल याचा काहीही संबंध नाही. एल्गार परिषदेतील भाषणांमुळे नक्षलवाद वाढू नये म्हणून संशयितांवर कारवाई सुरू आहे. जे आंबेडकरवादी आहेत; ते नक्षलवादी विचाराचे असू शकत नाहीत.
चौकट
आंबेडकरांमुळे मिळत नाही यश
“प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे रिपाइंचे आमदार व खासदार निवडून येत नाहीत. कोण्याही एकट्याला सध्या यश मिळत नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत आहोत,” असे रामदास आठवले यांनी सांगितले.