धायरी: सिंहगड रस्त्यावरील असणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही भाग पुणे शहर आयुक्तालयात समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात हवेली तालुक्यातील ४ गावे पुणे शहर पोलीस दलात येणार आहेत. या चार गावांसाठी नांदेड सिटी येथे नवीन पोलीस ठाणे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १५ गुंठे जागाही उपलब्ध करण्यात आली आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याच पार्श्वभूमीवर नांदेड सिटी येथे नवीन पोलीस ठाण्यासाठी जागेची पाहणी केली. यावेळी जागेची पाहणी नांदेड सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, स्वप्नाली गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार आदिजन उपस्थित होते.हवेली तालुक्यातील ४ गावे हि पुणे शहर पोलीस दलात येणार आहेत. या पोलीस ठाण्यासाठी नांदेड सिटी येथे १५ गुंठे जागाही उपलब्ध करण्यात आली आहे.
शहरालगत असणाऱ्या गावांत वाढत्या लोकसंख्येचा ताण वाढतो आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील काही भाग पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात आला आहे. सध्या हवेली पोलीस ठाण्यांतर्गत असणारी नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी ही चार गावे शहरआयुक्ताला जोडण्यात येणार आहेत. ही गावे शहरालगत असून या गावांचे शहरीकरण होत आहे. स्वस्तात फ्लॅट मिळतात म्हणून अनेक नोकरदारांनी या ठिकाणी फ्लॅट घेतले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यांची समस्या, वाहतुकीची समस्या निर्माण होत असून या भागांचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत आहे.
खडकवासला धरण पर्यटन क्षेत्र असल्याने परिसरात पर्यटकांची संख्या अधिक असते. बऱ्याचदा गुन्हेगार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करून शहरालगत असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरार होतात. यावेळी तपास कामात शहर पोलिसांना अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर हवेली पोलीस ठाण्यातील ही चार गावे पुणे शहर पोलीस दलाला जोडून विकासाबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. नांदेड सिटी येथील प्रशस्त जागेत हे नवीन पोलीस ठाणे होणार असले तरी या नवीन पोलीस ठाण्याचे नाव काय असेल हे मात्र गुलदस्त्यात आहे.
......सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचा काही भाग जोडला जाण्याची शक्यतासिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसंख्या व क्षेत्रफळ पाहता यातील नऱ्हे, वडगांव खुर्द व धायरी हा भाग नांदेड सिटी येथे नव्याने होणाऱ्या पोलीस ठाण्याला जोडण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.