खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता. भोर) येथील जकात नाक्यासमोरील नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, या पुलाच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहिला,तर झिकझॅक असून, अतिशय निकृष्ट व नियोजनबद्ध केला नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले.शिंंदेवाडी येथील जकात नाक्यासमोरील नवीन उड्डाण पुलाचे काम जवळजवळ दीड वर्षापासून रेंगाळत पडलेले होते. ‘लोकमत’ने या पुलाच्या कामाविषयी चीस्थिती वारंवार मांडली. अखेर मंगळवारी (दि. १९) वाहतुकीसाठी सर्वांना खुला करण्यात आला. या ठिकाणी गतवर्षासारखी पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहतुककोंडी होऊन कोणतही विपरीत घटना घडू नये म्हणून अगदी घाईघाईने पुलाचे काम पूर्ण करून जरी उड्डाण पूल खुला केला असला, तरी या पुलावरील रस्त्याचे कामची एकलेवल नसून अचानक खड्डा तर अचानक उंचवटा आहे. या ठिकाणाहून वाहने जात असताना वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे येथील खड्ड्यात अचानक गाडी आपटून पुढे जात आहे. शिवाय लगेचच गतिरोधकासारखा उंचावटा असल्यामुळे येथे वाहनचालकांचा ताबा सुटत आहे आणि यातूनच मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या पुलाच्या सुरुवातीलाच प्रवेशद्वाराजवळ नेहमीच रस्त्याची दुरवस्था पाहावयास मिळत आहे. या पुलाचे काम जरी पूर्ण केले असले तरी या ठिकाणी काही नियोजनाच्या गोष्टी करायला हव्यात त्या याठिकाणी आढळून येत नाहीत. कारण पुलाच्या सुरुवातीलाच असलेला दिशादर्शक फलक, जो मोठा असायला हवा, तो अतिशय छोटा असल्यामुळे वाहनचालकांच्या लवकर लक्षात येत नसल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. त्यामुळे पर्याय लक्षात न आल्यामुळे बायपास मार्गाकडे जाण्यासाठी वाहनचालक जुन्या मार्गाचाच अवलंब करीत असल्यामुळे येथे वाहतूककोंडी होत आहे. शिवाय याचा धोका असा, की या ठिकाणी वाहने नवीन पुलाकडे थोड्या अंतरावर गेली असताना परत रिवस टाकून पाठीमागे येत असल्यामुळे रात्री-अपरात्री अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. एकंदरीत पुलाच्या सुरुवातीला रस्त्याची अगदी चाळण झाली असून शिवाय नव्याने केलेल्या पुलाच्या रस्त्याचे काम झिकझॅक असल्यामुळे येथे वाहनांची सर्कस होत असलेली दिसत आहे. (वार्ताहर)
शिंंदेवाडीतील नवा पूलही धोकादायक
By admin | Published: August 27, 2014 5:18 AM