बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नव्याने प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 03:33 PM2020-03-03T15:33:24+5:302020-03-03T16:01:34+5:30

ड्रोन कॅमेऱ्यांमुळे सण-उत्सवांमध्ये बंदोबस्त, व्हीआयपी दौरे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी असणार

New proposal for CCTV cameras in Baramati | बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नव्याने प्रस्ताव 

बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नव्याने प्रस्ताव 

Next
ठळक मुद्देअर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळण्याची शक्यता ३२० अत्याधुनिक कॅमेरे व यंत्रणेसाठी ५ कोटींची मागणी मागील काही काळापासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरावर नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे ही बारामतीची गरज

रविकिरण सासवडे - 
बारामती : शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नव्याने राज्य शासनाच्या गृहमंत्रालयाकडे ५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार शहरावर ३२० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. त्यामुळे मागील काही काळापासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार आहे. 
शैक्षणिक संस्था, एमआयडीसी परिसर, प्रमुख बाजारपेठ, विविध शासकीय कार्यालये व शहराचे असणारे सुमारे सव्वा लाख लोकसंख्या यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने संपूर्ण शहरावर नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे ही बारामतीची गरज बनली आहे. वाढत्या गुन्हेगारी प्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही पोलीस प्रशासनाला उपयोगी पडणार आहेत. त्यासाठी नव्याने ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनास पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात ३२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये २०० कॅमेरे कायमस्वरूपी असणार आहेत. उर्वरित १२० कॅमेºयांमध्ये फेस रिक्रनाईज कॅमेरा (एफआरसी), पॅरारोमिक कॅमेरा, पीटीझेड कॅमेरा, एएनपीआर (वाहन क्रमांक तपासणी कॅमेरा), ड्रोन कॅमेरे आदी असणार आहेत. हे सर्व कॅमेरे वायर वेब सिस्टीमद्वारे जोडण्यात येणार आहेत. 
.....
सीसीटीव्हीमुळे होणारे फायदे...
सुरक्षितता वाढेल
महिलांच्या छेडछाडीला आळा घालण्यास मदत
चोरी, जबरी चोरी, दुचाकीचोरी, घरफोडी, दरोडा आदी गुन्ह्यांना आळा, तसेच तपासकामात गतिमानता येईल.
गँगवॉर, टोळीद्वारे होणारे गुन्हे कमी होतील.
गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल
 वाहतुकीचे नियमन होण्यास मदत
.........
बारामती शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मार्गावर कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. फेस रिक्रनाईज कॅमेऱ्यांमुळे शहरात येणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्याचे फोटो उपलब्ध होतील. त्यामुळे एखादी व्यक्ती गुन्हा करून शहराच्या कोणत्याही मार्गावरून पलायन करीत असेल तरीदेखील त्या व्यक्तीचा फोटो पोलीस प्रशासनाला उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तो फोटो आधारकार्ड वेबसाईटला लिंक केल्यास त्या व्यक्तीच्या नाव-पत्त्यासह इतर माहिती पोलिसांना मिळणार आहे. तसेच जास्त गर्दीच्या ठिकाणी पॅरारोमिक कॅमेरा ३६० कोनामध्ये फिरून त्या परिसराचे फुटेज घेईल. त्याचप्रमाणे एएनपीआर कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या क्रमांकावरून त्या व्यक्तीचा तपास करणे शक्य होईल. पीटीझेड हे झोमिंग कॅमेरे असून सुमारे अर्धा किलोमीटरवरील दृश्य या कॅमेऱ्यांमध्ये झूम करून तपासता येणार आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांमुळे सण-उत्सवांमध्ये बंदोबस्त, व्हीआयपी दौरे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी असणार आहेत. 
..........
बारामती शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करीत आहो  - नारायण शिरगावकर; उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग. 

Web Title: New proposal for CCTV cameras in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.