लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : देश कोणाच्या नावाने चालक नाही तर भारतीय राज्यघटने प्रमाणे चालला पाहिजे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्त्री- पुरुष समानता, धर्मनिरपेक्ष,स्वातंत्र्य,समता, बधुंता हे सारखेच असे आपण म्हणतो. मात्र देशात सध्या भेदभाव करुन विषमता सुरु आहे. देशात देखील राजकीय जोरात भांडण सुरु आहे. तर सध्याची नवी राजवट ही काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही त्यासाठी सर्वानी आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट झाले पाहिजे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी व्यक्त केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, अॅड.सुषमा अंधारे, बाळासाहेब अमराळे, वैशाली गाडगीळ, पराग गाडगीळ, अॅड. प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, सपना लालचंदानी, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव इ. उपस्थित होते.
यावेळी विविध कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारीका क्षेत्रातील विविध मान्यवरांना भूषण पुरस्कार देऊन गौवरवण्यात आले. यामध्ये यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ, उद्योग भूषण पुरस्कार युवराज ढमाले, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीत भूषण पुरस्कार कौशल इनामदार, धार्मिक भूषण पुरस्कार श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगावचे विश्वस्त प्रकाश देवळे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला.
अॅड. सुषमा अंधारे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री- पुरूष भेदभाव न करता घटनेत समानता दिली. महिलांनी पुढाकरा घ्यावा साठी विशेष प्रयत्न केले. प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी उर्जेचा स्त्रोत असते. कुटुंबाला उभे करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो.प्रबळ इच्छाशक्ती असेल तर प्रतिकूलतेवर मात करता येते आणि आपण राजकारणासह कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे काम करु शकतो.
पत्रकारिता भुषण पुरस्कारर्थी संजय आवटे म्हणाले, ज्या देशात महिला सक्षम आहेत त्या देशात काहीच वाईट घडू शकत नाही. पुरूष आणि स्त्रीयांमध्ये समता असणे अत्यंत महत्वाचे आहे आणि या समतेच्या न्याय हक्कासाठी संविधानासाठी पत्रकारीका फार महत्तावाची आहे. तसेच पुरस्काराला उत्तर देताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, कला क्षेत्र म्हणजे ग्लॅमर, पैसा या गोष्टी दिसतात. मात्र, त्यामागे मोठे कष्ट असतात. घरातील परिस्थिती, आलेली संकटे यांना तोंड देत आम्ही रसिकांचे मनोरंजन करीत असतो. जेव्हा रसिकांची कौतुकाची थाप पडते, तेव्हा कलाकारामधील उत्साह व उमेद वाढते, असेही त्यांनी सांगितले. रामदास फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचलन केले.