लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राखीगढी या हरियाणा राज्यातील पुरातत्त्वीय स्थळाच्या उत्खननातून हडप्पा संस्कृतीच्या अनेक पैलूंवर प्रकाश पडला आहे. आता संशोधकांच्या व्याख्यानांमधून या संस्कृतीमधील सामाजिक, आर्थिक रचनेचाही उलगडा होईल, असे मत हडप्पा संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्येष्ठ संशोधक आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर वसंत शिंदे यांनी व्यक्त केले.
डेक्कन कॉलेजच्या द्विशताब्दीपूर्ती निमित्त हडप्पा संस्कृतीवरील कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. शिंदे यांच्याहस्ते सोमवारी सायंकाळी झाले. शिंदे म्हणाले की, आधुनिक तंत्राचा, संशोधन पद्धतीचा वापर करून गेली १० वर्षे या परिसरात संशोधन सुरू आहे. आता या व्याख्यानमालेतून त्याचे निष्कर्ष सांगितले जातील.
स्वागत व प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी केले. ‘मेटल इनोव्हेशन्स’चे संचालक मुकुंद देशपांडे यांनी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठासोबत काम करण्यामागील त्यांची भूमिका विशद केली. पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर पी. डी. साबळे यांनी आभार व्यक्त केले. डेक्कन कॉलेज द्विशताब्दीवर्ष कार्यशाळा शृंखलेच्या समन्वयक डॉ. माधवी गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले.
संपूर्ण महिनाभर चालणाऱ्या या कार्यशाळेत एकूण २५ व्याख्याने होणार आहेत. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी डेक्कन कॉलेजशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.