दौंड: येथील डिफेन्स कॉलनी परिसरात दोन महिन्यांपूर्वी नवीन डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, सध्या हा रस्ता ठिकठिकाणी खचू लागल्याचे निदर्शनास येत आहे. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे समोर येत असून स्थानिकांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
डिफेन्स कॉलनी परिसरातील या रस्त्याचा वापर दौंडच्या विस्तारीत भागातील रहिवासी करीत असतात. रेल्वे स्टेशन आणि जुन्या गावठाणात येण्यासाठी हा रस्ता जवळचा असल्याने रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. परिणामी नागरिकांच्या सोईसाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी नगरपरिषदेच्या वतीने या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. मात्र, आता हा रस्ता ठिकठिकाणी खचू लागला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या व्यवस्थित भरल्या गेलेल्या नाही तर रस्त्यावर डांबरीकरणाचा तिसरा कोट झालेला नाही. एका चेंबरच्या परिसरात हा रस्ता डांबरीकरणाअभावी अर्धवट सोडलेला आहे. परिणामी डांबरीकरणऐवजी रस्त्याला मुरुम आणि मातीचा थर दिलेला आहे.
दोन महिन्यांच्या आतच रस्त्याच्या निकृष्ट कामाचा अजब नमुना नागरिकांना पाहावयास मिळत असल्याने नगर परिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांच्या भोंगळ कामकाजाबाबत नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच जोपर्यंत हा रस्ता नियमानुसार दर्जेदार होत नाही तोपर्यंत बांधकाम ठेकेदाराला रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊ नये, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.
इथं अजितदादाच पाहिजे...
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. एखाद्या विकासकामाबाबत त्यांच्याकडून होणारा पाठपुरावा नेहमीच सर्वांच्या लक्षात राहतो. त्यामुळे डिफेन्स कॉलनीतील या रस्त्यावर पहाटे आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी या रस्त्याच्या निकृष्ट कामकाजाबाबत संताप व्यक्त तर केलाच, पण ठेकेदार आणि नगरपरिषद प्रशासनाला त्यांच्या कामाची जाणीव करून देण्यासाठी इथं अजितदादाच पाहिजे, अशी चर्चाही सुरु झाली आहे.
२४ दौंड रस्ता.
डिफेन्स कॉलनीतील खचू लागलेला रस्ता.