पुणे : पुण्याच्या नाट्यवर्तुळात मानाची समजली जाणाऱ्या फिराेदिया करंडक एकांकिका स्पर्धेत विषय निवडीबाबत अनेक नियम टाकण्यात आल्याने नाट्यकर्मींमध्ये नाराजीचे वातावरण हाेते. हे नियम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची टीका झाल्यानंतर आता फिराेदियाच्या आयाेजकांकडून विषय निवडीबाबतचे सर्व नियम मागे घेण्यात आले आहेत. परंतु प्रत्येक स्क्रिप्ट सेन्साॅर केल्याशिवाय सादरीकरणास परवानगी देणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आयाेजकांनी ही माहिती दिली आहे.
फिराेदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेत यंदा नवीन नियमांची भर घालण्यात आली हाेती. यावर्षी सादर हाेणाऱ्या एकांकिकांमध्ये हिंदू – मुसलमान, जम्मू व काश्मीर, कलम३७ ०/३५अ, भारत पाकिस्तान, राम मंदिर – बाबरी मस्जिद या बाबतचे कुठलेही विषय, इतर कुठल्याही जाती धर्माबाबत भाष्य करणाऱ्या विषयांवर सादरीकरण करु नये अशी अट फिराेदियाच्या आयाेजकांकडून महाविद्यालय संघांना घालण्यात आली हाेती.
या नियमांवर सर्वच स्तरातून टीका झाली. महाविद्यालयीन संघांनी देखील हे नियम जाचक असल्याचे म्हंटले हाेते. तर दुसरीकडे अनेक नाट्यकर्मींनी हे नियम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हंटले हाेते. साेशल मीडियावर फिराेदिया करंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या पाेस्ट देखील व्हायरल झाल्या हाेत्या. सगळीकडूनच टीका हाेत असल्याने अखेर फिराेदियाच्या आयाेजकांनी विषय निवडीबाबतचे नियम मागे घेतले आहे.
प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आयाेजकांनी म्हंटले आहे की विषय निवडताना त्याच त्याच विषयांची मांडणी कमी व्हावी, मुलांनी जाती- धर्माच्या पलीकडे जाऊन वेगळा विचार करावा, जाती - धर्मामध्ये तेढ निर्माण हाेईल असे विषय टाळून नाविन्यपूर्ण विषय हाताळावेत या हेतूने नवीन नियम सामाविष्ट केले हाेते. परंतु या नियमांचा वेगळा अर्थ घेतला गेला. आयाेजकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कुठलाही हेतू नव्हता व तसा कधीही असू शकत नाही. परंतु हा विषय चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला. त्यामुळे आम्ही विषय निवडीबाबतचे सर्व नियम मागे घेत असल्याचे आयाेजकांकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु एकांकिका सादर करण्यापूर्वी सेन्सा्ॅर मंडळाची परवानगी घेतल्याशिवाय एकांकिका सादर करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचेही आयाेजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.