पुणे : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून शहरातील उद्याने, सर्व पर्यटनस्थळे नियोजित वेळेनुसार खुली करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, आठवडे बाजारही सर्व दिवस खुले राहणार आहेत.
शहरातील स्पा, सलून, ब्युटी पार्लर, मनोरंजन पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क, रेस्टॉरंट, हॉटेल, सिनेमागृहे, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व उद्याने सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत खुली राहणार आहेत. खेळांशी निगडीत सर्व स्पर्धा स्टेडियम आसन क्षमतेच्या २५ टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.
अंत्यविधी तसेच अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित नागरिकांच्या संख्येस कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. खुल्या जागेतील विवाह सोहळयांसाठी जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना आणि बंदिस्त जागेतील समारंभासाठी २०० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी जाणा-या सर्व नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच, कोरोना प्रतिबंधक वर्तनाचे पालन करणे आवश्यक आहे.