पुणे : जिल्ह्यात नव्याने सहा बोगस डॉक्टर आढळले असून, लवकरच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एक बैैठक घेऊन त्याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच, कारवाईसाठी योग्य पावले उचलणार असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.लोकमतने ‘बोगस डॉक्टरांची दुकाने राजरोस सुरूच’ असे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. याबाबत डॉ. भगवान पवार यांना विचारले असता, ‘‘आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात ३४ बोगस डॉक्टर आढळले आहेत. त्यांच्यापैैकी काहींवर एफआरआय दाखल केलेले असून, काहींच्या केस कोर्टात सुरू आहेत,’’ असे सांगितले. त्यांचे दवाखाने बंद असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. आरोग्य विभागाने नव्याने बोगस डॉक्टरांचे सर्वेक्षण केले असून, आणखी सहा जण बोगस आढळले आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. वेल्हे तालुक्यात राजे पवार नावाचे बोगस डॉक्टर आढले असून, त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांकडे पत्र दिले आहे. तसेच, शिरूर तालुक्यात ज्ञानेश्वर ढेरे हे बोगस आढळले असून, त्यांच्यावर एफआरआय दाखल केला आहे. खेडमध्ये तर चार बोगस डॉक्टर आढळले आहेत. त्यात श्री बाईन, विश्वास पाटील, एस. एम. रॉय व कुमार यांचा समावेश आहे. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांसंदर्भात दोन समित्या आहेत. यांत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीचा समावेश आहे. तालुकास्तरीय समिती ही गटविकास अधिकारी, तर जिल्हास्तरीय समिती ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असते. तालुकास्तरीय समिती आलेल्या तक्रारीवरून किंवा पाहणी करून बोगस डॉक्टर निष्पन्न करते. यानंतर त्या-त्या भागातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करते. तालुकास्तरीय समितीच्या काही अडचणी असतील, तर जिल्हास्तरीय समिती त्यांचे निराकारण करते. या बोगस डॉक्टरांबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आम्ही लवकरच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर जिल्हास्तरीय बैैठक घेऊन निर्णय घेणार आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)- बोगस डॉक्टरांची दुकाने ही घरात, पडवीत एखादा टेबल टाकून सुरू असतात. कारवाईचे संकेत मिळाले, की ते तेथून पसार होतात. परत पुढच्या कोणत्या तरी गावात किंवा तालुक्यात ते दुकान सुरू करतात. त्यांचा कायमचा ठावठिकाणा नसल्याने त्यांना शोधायचे कुठे, हा प्रश्न पडतो. शासनाच्या अध्यादेशानुसार आरोग्य विभागाला बोगस डॉक्टर आढळल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये एफआरआय दाखल करण्याचा अधिकार आहे. पुढील कारवाई ही पोलीस व कोर्टात होते.- भगवान पवार, आरोग्य अधिकारी
नव्याने सहा बोगस डॉक्टर
By admin | Published: October 01, 2016 3:37 AM