प्रज्ञा केळकर- सिंग
पुणे : गेल्या वर्षभरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ससून सर्वोपचार रुग्णालयाने मोठी जबाबदारी पेलली आहे. येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी साथ हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. विषाणूच्या वेगाने पसरत असलेल्या संसर्गामुळे प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. महामारी काळातील मार्गदर्शक तत्वे अभ्यासक्रमाच्या स्वरूपात अंतर्भूत करावीत, अशा स्वरूपाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना देण्यात आले आहे.
अभ्यासक्रमांमुळे साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्यांची फळी तयार होऊ शकेल. पुणे जिल्हा आरोग्य कार्यालय आणि ससूनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात केस स्टडीवर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. तेव्हा आम्ही या संदर्भात सहकार्य केले तेव्हा हा प्रयत्न सुरू झाला होता.
जिल्हा परिषद आणि ससूनच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रम तयार करण्याची कल्पना पुढे आली आहे. ऑनलाईन लर्निंग प्लँटफॉर्मच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देता येऊ शकेल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र किंवा डिप्लोमाची पदवी दिली जाईल.
अभ्यासक्रमाची रूपरेषा, त्यातील विषय, व्हिडीओ लेक्चर, गुणांकन पद्धत तयार झाल्यावर पुणे जिल्हा डिस्ट्रिक्ट सोसायटीतर्फे व्हिडीओ रेकॉर्डिंग, अभ्यासक्रमातील विषयांचे प्रकाशन यामध्ये सहाय्य करेल. अभ्यासक्रमात इंटेनसिव्ह कोव्हीड केअर, कोरोना काळात मुलांची काळजी, गर्भवतींची काळजी, स्तनदा मातांसाठी मार्गदर्शक तत्वे, कोरोनाग्रस्त गर्भवतींची प्रसूती, रुग्णालयांमधील कोव्हीड व्यवस्थापन, प्रयोगशाळा आदि विषयांचा समावेश असावा, असे नमूद करण्यात आले आहे.