लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाबरोबर असणाऱ्या त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अल्पवयीन मुलांचा जो रक्तगट होता, त्याच रक्तगटाचे इतर तीन जण यावेळी बोलावण्यात आले होते. त्यापैकी एक महिला आणि दोन पुरुष होते. डॉ. श्रीहरी हळनोर हा कामावर असतानाच हा प्रकार घडला. ससूनमधील सूत्रांनी ही माहिती दिली.
अल्पवयीन मुलगा व त्याच्याबरोबर असलेल्या दाेन अल्पवयीन मित्रांना ससून रुग्णालयात अपघाताच्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणले हाेते. त्यावेळी, या तिघांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले. परंतु, त्यांचे रक्तनमुने न देता त्यांच्याऐवजी इतर तीन व्यक्तींचे रक्तनमुने पाेलिसांच्या ताब्यात दिले. हे रक्तनमुने त्यांचेच आहेत, हे भासावे, यासाठी आराेपींचा जाे रक्तगट आहे, त्याच रक्तगटाचे तीन जण आहेत ना, याची दक्षता घेतली हाेती, अशी माहिती ससून रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
‘ससून’च्या दोन नर्सेसची गुन्हे शाखेकडून चौकशी
- कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील धक्कादायक खुलाशानंतर डॉ. अजय तावरे अधीक्षक असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या दोन महिला परिचारिकांची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात आली.
- यात पोलिसांनी आणखी काही धागेदोरे हाती लागताहेत का? याबाबत चाैकशी केली. या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात डॉ. तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे आजवरच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच धर्तीवर ही चौकशी करण्यात आली.
- मुलाला वाचवण्यासाठी बापाने डॉ. अजय तावरे याला हाताशी धरून अल्पवयीन बाळाचे रक्त तपासणीसाठी न देता अन्य दुसऱ्याचे रक्त दिले होते. यामध्ये डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि शिपाई घटकांबळे यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. पोलिसांच्या तपासात हा धक्कायक प्रकार उघड झाला होता.
रॅप साँग बनविणारा ‘निखरा’ गैरहजर
पोर्शे कार अपघातात बळी पडलेल्यांची थट्टा करणारा वादग्रस्त रॅप तयार करणारा तरुण आर्यन निखरा याला पुणे पोलिसांनी चौकशी सत्राला उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. आर्यन निखरा हा मूळचा आंध्र प्रदेशातील असून, समन्स बजावल्यानंतरही तो हजर झाला नाही.
डीएनए चाचणीमुळे आले उघडकीस
- रक्ताची चाचणी करताना रक्तगट एकच यावा, याची पुरेपूर काळजी घेतली. परंतु, त्यापैकी अल्पवयीन मुलाचा नमुना पाेलिसांनी दुसऱ्यांदा घेतला आणि त्याच्या डीएनए चाचणीसाठी औंध रस्त्यावरील विभागीय न्यायवैद्यक प्रयाेगशाळेत पाठविला.
- ससूनमधील नमुना आणि औंध रुग्णालयातील घेतलेला रक्ताचा नमुना त्यावेळी एक नसल्याचे समोर आले. या डीएनए चाचणीमध्ये दाेन्ही एक्स, एक्स क्राेमाेसोम आल्यामुळे हा रक्तनमुना महिलेचा असल्याचे उघडकीस आले.
- चौकशी समितीतही ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यानंतर डाॅ. हळनाेरला पाेलिसांनी अटक केली. तर, घेण्यात आलेले उर्वरित दोन नमुने हे पुरुषांचे होते, अशी माहिती तेथील सूत्रांनी दिली.
शिकाऊ डाॅक्टरांनी घेतले हाेते रक्ताचे नमुने
- या आराेपींच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील दाेन इंटर्न म्हणजे शिकाऊ डाॅक्टरांनी घेतले हाेते.
- परंतु, रक्तनमुने बदलल्यानंतर डाॅ. श्रीहरी हळनाेरला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला हाेता.
- परंतु, त्यावेळी वेळ निघून गेली हाेती. पाेलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत वाढ...
कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक बाळाला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने ५ जूनपर्यंत वाढ केली आहे.
'ते' रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचे नाहीच
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसऱ्या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणात मुलाच्या आईनेच ते रक्त दिल्याची चर्चा रंगली असताना रक्ताच्या नमुन्यांचा प्राप्त झालेला अहवाल व ते नमुन्यांसाठी दिलेले रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचे नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली. कारण पोलिसांनी नंतर काढलेल्या रक्ताच्या डीएनएशी आईच्या रक्ताचे नमुने जुळले असते. परंतु, पोलिसांच्या तपासात ते नमुने जुळले नसल्याचे यापूर्वीच पोलिसांनी सांगितले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेतले रक्ताचे नमुने
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले आहेत, अशी माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. ३०) न्यायालयात दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामादेखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.