पुणे : राज्यातील सर्व विद्यापीठांतील कामकाजात सुसूत्रता यावी, या उद्देशाने राज्य शासनातर्फे नवीन विद्यापीठ कायदा मंजूर करण्यात आला. कायद्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे. मात्र, राज्यात जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे निवडणुकानंतर नवीन विद्यापीठ कायद्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्याच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत विद्यापीठ कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कामकाजात सुसूत्रता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठात व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. यामुळे केवळ विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, प्राचार्यच नाहीत, तर विद्यार्थीही नवीन कायद्याच्या अंमलबजवणीची वाट पाहत आहेत. (प्रतिनिधी) विद्यापीठ कायदा मंजूर झाला असला तरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक असलेले स्टॅट्युट तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. राज्यपाल कार्यालय आणि राज्य शासनातर्फे कायद्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढून कायदा लागू करण्याबाबतचे केवळ औपचारिक काम राहिले आहे. त्यामुळे निवडणुकींच्या धामधुमीनंतर विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीनंतर नवा विद्यापीठ कायदा येणार?
By admin | Published: February 20, 2017 3:10 AM