पुणे : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयां (आरटीओ) चे कामकाज काहीअंशी सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार पुण्यात सोमवार (दि. १८) पासून नवीन वाहन नोंदणी सुरू केली जाणार आहे. तसेच अन्य वाहनांशी संबंधित अन्य ऑनलाईन सुविधा सुरू करण्याचे धोरणही लवकरच निश्चित करून त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पुण्याचे आरटीओ अजित शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
राज्यात लॉकडाऊनला सुरूवात झाल्यापासून सर्व आरटीओ कार्यालयांमधील कामकाज बंद आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नोंदणी करूनही अनेकांना वाहन मिळाले नाही. लॉकडाऊनचा कालावधी सातत्याने वाढत गेल्याने वाहन मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. पण आता ही प्रतिक्षा संपणार असून परिवहन विभागाने आरटीओचे कामकाज काहीअंशी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारपासून नवीन वाहन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच यापुर्वी नोंदणी केलेल्या बीएस ६ मानकाच्या वाहनांचे वितरणही ग्राहकांना करता येणार आहे. त्यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, कन्टेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी वाहन खरेदी करता येणार आहे.
याविषयी बोलताना पुण्याचे आरटीओ अजित शिंदे म्हणाले, नवीन वाहनांची नोंदणी कन्टेन्मेंट झोन वगळून इतर भागात सोमवारपासून सुरू होईल. त्यामुळे ग्राहकांना वाहन खरेदी करता येईल. वितरकांनी विक्री केलेल्या वाहनांची तपासणी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक तिथे जातील. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. तसेच लॉकडाऊनपुर्वी खरेदी केलेल्या बीएस ४ वाहनांना ३० एप्रिलपुर्वी नोंदणी क्रमांक दिला आहे. तर बीएस ६ वाहनांना नोंदणी क्रमांक देण्याचे काम आठवडाभरात पुर्ण केले जाईल. या वाहनांना वितरकांकडून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दिली जाईल. ही नंबर प्लेट बसविल्यानंतरच वाहने रस्त्यावर वापरता येतील. टपाल कार्यालयाशी चर्चा केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र टपालाद्वारे पाठविले जाईल. शोरुम सुरू करण्याबाबत वितरक ठरवतील. तसेच काही ऑनलाईन सुविधाही सुरू केल्या जातील. मात्र, नवीन परवाना, नुतणीकरण, वाहन हस्तांतरण आदी सेवांबाबत धोरण निश्चित करून अंमलबजावणी केली जाईल. वाहन चालविण्याचा परवाना देण्याचे कामकाज सध्या बंदच राहील.वाहन नोंदणी सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. तसेच परवाना नुतणीकरण, वाहन कर भरणे यांसह अन्य काही ऑनलाईन सुविधाही सुरू होतील. वाहन चालविण्याच्या परवान्याची मुदत संपली असल्यास त्यांना ३० जुनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नवीन परवान्यासाठी चाचणी घ्यावी लागत असल्याने ते सुरू करणे सध्या शक्य नाही. ग्रीन झोनमध्ये आणखी काही सेवा सुरू करता येऊ शकतात.- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र