पुणे : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत प्रत्येक जण मोठ्या उत्साहात करत असतो. नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला रात्री पार्टी ही ठरलेलीच असते. अनेक मंडळींनी ३१ डिसेंबरच्या पार्टीचे बेत आखले देखील आहेत. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत परमिट रूम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
शहरात सर्वांनाच नवीन वर्षाची आतुरता आहे. एरवी परमिट रूमसह देशी व विदेशी मद्यांच्या दुकानांना वेळ पाळणे बंधनकारक असते. एरवी देशी व विदेशी मद्यांची दुकाने साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत बंद करावी लागतात. पण येत्या शनिवारी ही दुकाने मध्यरात्री १ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत. यासह रात्री दीड वाजता बंद होणारे बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली.
दीड लाख जणांना मद्याचे परवाने
३१ डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे १ लाख ५० हजार लोकांना एकदिवसीय देशी व विदेशी मद्यसेवन परवाने वितरीत करण्यात आले आहेत. असे असताना अवैध मद्यसेवन, मद्यविक्री करणाऱ्यांवर एक्साईज विभागातर्फे कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. यासाठी १४ नियमित पथकांसह १० अतिरिक्त अशा २४ पथकांकडून तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.