पुणे : नवीन वर्षानिमित्त दगडुशेठ गणपतीसह विविध मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक विभागातर्फे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक बाह्यमार्गे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आज (शनिवारी) संध्याकाळ ७ ते रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत फर्ग्युसन कॉलेज रोड, एम. जी. रोड रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली.
नववर्षाच्या स्वागतासाठी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येतात. नागरिकांच्या सेलेब्रेशनमध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी शनिवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते रविवारी (ता. १) पहाटे ५ पर्यंत नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक कॅफे) ते फर्ग्युसन कॉलेजपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याचवेळेत लष्कर परिसरातील एम. जी. रोड १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर या दरम्यानचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतुकीतील बदल असा :
- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता येथे स. गो. बर्वे चौक ते महापालिका भवन, शनिवार वाडा, गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक या मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे.
- पर्यायी मार्ग-स. गो. बर्वे चौक ते जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, डेक्कन येथून इच्छितस्थळी जाता येईल. तसेच गाडगीळ पुतळा डावीकडे वळून सूर्या हॉस्पिटल समोरून इच्छितस्थळी जाता येईल.
लष्कर परिसरातील बंद रस्ता व पर्यायी मार्ग :
- महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक १५ ऑगस्ट चौकातून कुरेशी मशीदमार्गे पुढे जाईल.
- इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाता येणार नाही.
- व्होल्गा चौकाकडून महम्मद रफी चौकाकडे वाहतूक बंद.
- इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद.
- सरबतवाला चौकाकडून स्ट्रीट रस्त्याने जावे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या चालकांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीसाठी एक ब्लो पाइप वापरण्यात येणार आहे. नागरिकांनी मद्यपान करून वाहने चालवू नयेत, असे आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले आहे.