लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येला (दि. ३१) शहर पोलिसांनी संपूर्ण शहरात पुन्हा एकदा कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी कोम्बिंगमध्ये तब्बल २ हजार ८९३ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. यात ७५६ गुन्हेगार मिळून आले तर ४१४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले. ४४३ जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी १६ लाख ६२ हजारांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी ८ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ७ पिस्तूले, १ गावठी कट्टा व ९ जिवंत काडतुसे असा २ लाख ९९ हजारांचा माल जप्त केला.
सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या परिसरात अमली पदार्थ (एमडी) बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्या ताब्यातून ७ लाख ५६ हजारांचे ६३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. बुधवारी रात्री १० वाजल्यापासून गुरूवारी पहाटे दीड वाजेपर्यंत पाचही परिमंडळाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकांबरोबरच सर्व गुन्हे शाखांची पथके यात सहभागी झाली होती.
चौकट
शस्त्र बाळगणाऱ्या ६६ जणांना अटक
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ४८ कोयते, १४ तलवारी, १ कुकरी, ५ पालघन असा १७ हजार ९०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने ३८ गुन्हे दाखल करून ३८ जणांना अटक केली.
चौकट
१६ तडीपार आढळले
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान १६ तडीपार गुंड शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे आढळले. त्यांना अटक करण्यात आली. संशयितपणे फिरणाऱ्या २८ जणांवर कारवाई करण्यात आली.
चौकट
गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथकाने दोघा संशयितांना ताब्यात घेऊन सव्वा तीन लाख रुपयांची ८ चोरीची वाहने जप्त केली. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अडीच लाखांचा गुटखा जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने १८ हजारांचा गांजा जप्त केला.
चौकट
यांचे नेतृत्त्व
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार, सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, सर्व परिमंडळ पोलिस उपायुक्त , गुन्हे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी गुंडांची धरपकड केली.
---------------------------------