लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : येत्या नवीन वर्षात शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत पालिकेच्या नाट्यगृहांमध्ये सुमारे ४८३ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व रंगमंदिर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह या तीन नाट्यगृहांमध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून, या नाट्यगृहांतील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तारखांचेही वाटप करण्यात आले आहे.
सरते वर्ष कला विश्वासाठी कसोटीचे ठरणारे असले तरी नवीन वर्षात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत बालगंधर्व रंगमंदिरात १९० कार्यक्रम, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २१४ कार्यक्रम आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात ७९ कार्यक्रम होणार आहेत तर गणेश कला क्रीडा रंगमंचासह उपनगरांतील इतर नाट्यगृहांमध्येही काही कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लावणी, ऑक्रेस्ट्रा, अन्य भाषिक नाटक, शाळा-संस्था अन प्रतिष्ठानचे कार्यक्रम, प्रशासकीय कार्यक्रम, एकपात्री कार्यक्रम, व्यावसायिक नाटके, प्रायोगिक नाटके, संगीत नाटके, गुढी पाडवा पहाट कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, संगीत मैफीली आणि राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते म्हणाले, कलाकार आणि संयोजन संस्थांनी नवीन वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. त्यांना जानेवारी ते एप्रिलपर्यंतच्या तारखांचे वाटप केले आहे. उपनगरांतील नाट्यगृहांमध्येही कार्यक्रमांसाठी विचारणा होत आहे. दरवर्षी नाट्यगहांसाठी चौमाही आरक्षण असते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील जानेवारी ते एप्रिल महिन्यांच्या तारखांचे वाटप झाले आहे. आता दुसर्या टप्प्यात मे ते ऑगस्ट, तिसऱ्या टप्प्यात सप्टेंबर ते डिसेंबर आणि त्यानंतर पुन्हा जानेवारी ते एप्रिल अशा पद्धतीने नाट्यगृहांचे बुकिंग केले जाईल.