पुणे : पुणे महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार यांना ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणेअकरापर्यंतच परवानगी दिली आहे. कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून, कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये असेही पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे यंदाचे नववर्षाचे हॉटेलमधील सेलिब्रेशन विना डीजे व रात्री पावणेअकरापर्यंतच करावे लागणार आहे.
महापालिकेने दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना तथा व्यक्तीवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश बुधवारी जारी केले आहेत. यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे असे सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी महापालिका हदद्ीतील उद्याने, मोकळी मैदाने, पर्यटनस्थळे तसेच रस्त्यावंर अशा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये़ तसेच गर्दी आकर्षित होईल असे कोणतेही कार्यक्रम, मिरवणुका कोणीही आयोजित करू नये, फटाक्यांची आतिषबाजी करू नये असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणेअकरापर्यंतच हॉटेलला परवानगी देताना महापालिकेने होम डिलेवरी सुविधा देखील याचवेळी बंद करावी असे सांगितले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जातात या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळावर सोशल डिस्टन्सींगचे पालन होईल याची खबरदारी घेऊन, आरोग्य व स्वच्छतेच्यादृष्टीने योग्य त्या खबरदाºया घेण्यात याव्यात.