लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ब्रिटनसह अन्य काही देशांमध्ये कोरोना विषाणू नव्या स्वरुपात आढळून आल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे प्रामुख्याने युरोपात घबराट पसरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या या नव्या अवताराचा अभ्यास पुण्यातले शास्त्रज्ञही करणार आहेत.
यासाठी संबंधित देशातील प्रवासी किंवा त्यांच्या संपर्कात येऊन बाधित झालेल्या रुग्णांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या रुग्णांमधील विषाणुच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करण्याची तयारी पुण्यातील काही प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञांनी केली आहे.
ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात ‘कोरोना’ची नवी प्रजाती आढळून आली. कोरोनाचा हा नवा अवतार आधीच्या विषाणुच्या तुलनेत ७० टक्के अधिक वेगाने संक्रमित होत आहे. या नव्या विषाणुच्या जनुकीय रचनेत बदल (म्युटेशन) झाले आहेत. ब्रिटनसह, दक्षिण आफ्रिका, इटली, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ब्रिटन, नेदरलँड तसेच अन्य काही युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचे नवे रुप आढळल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे जागितक आरोग्य संघटनेनेही सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. काही देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नाताळचे कार्यक्रम, विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. भारतात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांना या विषाणुचा संसर्ग झाल्याचे मंगळवारी तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे आता भारतातील यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
चौकट
पुण्यातील एका शासकीय प्रयोगशाळेतील सुक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, नवीन विषाणुच्या जनुकीय रचनेबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही. चीनमधील वुहानमध्ये आढळून आलेला विषाणू हे मुळ गृहित धरले तरी त्याच्या भारतीय स्वरुपातही अनेक बदल दिसून आले आहेत. पुण्यात आढळलेल्या विषाणुमध्येही बदल झाले होते. पण ब्रिटनमधील विषाणुत अधिक प्रमाणात संक्रमण झाल्याचे दिसते. त्यामुळे त्याच्या जनुकीय रचनेतील बदलांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यानुसार अभ्यास सुरू करणार आहोत. आपण प्रत्येक रुग्णातील विषाणुच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करू शकणार आहे. संबंधित देशांतील प्रवासाचा इतिहास किंवा त्यांच्या संपर्कातील लोक किंवा काही निवडक रुग्णांचा अभ्यास केला जाणार आहे.