पुणे : पहिला श्वास घेता न आल्याने अनेक नवजात बालकांचा जीव धोक्यात येतो. यामुळे पहिल्या काही मनिटांत अशा बालकांना कृत्रिम श्वासोच्छ्वास दिल्यास अशा नवजात बालकांना जीवदान मिळू शकते. यासाठीच महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या प्रसूतिगृहात जन्माला येणाऱ्या अर्भकांसाठी गोल्डन फर्स्ट मिनीट न्यूओनेटल रेस्पिरेटर ही ४ उपकरणे खरेदी करण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.आॅक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मेंदूवर दुष्परिणाम होऊन बाळ मतिमंद होऊ शकते. यामुळे पहिल्या काही मिनिटांत अशा बालकांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे अत्यंत आवश्यक असते. परंतु, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या अशी सुविधा उपलब्ध नाही. गोल्डन फर्स्ट मिनीट न्यूओनेट रेस्पिरेटर या उपकरणामुळे जन्मलेल्या बाळांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी उपयुक्त ठरते. पुणे महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात चार उपकरणे खरेदी केली होती. कमला नेहरू रुग्णालय, मालती काची रुग्णालय, गाडीखाना, सावित्रीबाई फुले रुग्णालय, गुरुवार पेठ या ठिकाणी ही उपकरणे कार्यरत आहेत. एका उपकरणाची किंमत ७ लाख ५० हजार रुपये आहे. ३० लाख रुपयांची एकूण ४ उपकरणे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हा नियोजन समितीला ३० लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली.>नवीन खरेदी करण्यात येणारी उपकरणे होमी भाभा रुग्णालय, वडारवाडी, राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, दळवी रुग्णालय, शिवाजीनगर आणि सोनावणे रुग्णालय भवानी पेठ येथ बसविण्यात येणार आहेत.
नवजात अर्भकांना मिळणार जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 1:29 AM