नवीन आलेल्यांना तिकीट, ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही; उमेदवारीवरून आबा बागुल नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 01:14 PM2024-03-22T13:14:19+5:302024-03-22T13:39:13+5:30
निष्ठावंत लोकांवर अन्याय करून आता विद्यमान आमदारांना तिकीट देऊन काँगेसने काय साध्य केलं हे विचारावं लागेल .
पुणे : काँग्रेसच्या दिल्लीतून प्रसिद्ध झालेल्या यादीत अखेर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवार म्हणून घोषित करण्यात आली. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आता महायुतीचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना होणार आहे. मोहोळ यांच्यासमवेत कोरोना काळात त्यांनी महापौर म्हणून केलेल्या कामाचे वलय आहे, तर धंगेकर यांच्याबरोबर कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देताना दाखविलेला करिष्मा आहे. या उमेदवारीनंतर पुण्यात काँग्रेसचे नाराजीनाट्य दिसून आले आहे. त्यावरून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी नवीन आलेल्याना तिकीट दिले जाते आणि ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही. हि निष्ठांवंत पदाधिकाऱ्यांची हत्या असल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी सकाळी शिवदर्शन ई लर्निंग स्कूल येथे पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली.
बागुल म्हणाले, पुण्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निष्ठावंत लोकांना धक्का आहे. त्यांना न्याय मिळेल हि अपेक्षा आहे. खरंतर ही निष्ठावन्त लोकांची हत्या म्हणायला पाहिजे. ४० वर्ष काम करणाऱ्यांना तिकीट दिल नाही. आता आलेले आमदार त्यांना तिकीट दिल गेलं. ते सेने मनसेतुन आले आहेत. अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनंतर पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. त्यांना आम्ही, पक्षाने मेहनत करून निवडून आणलं. आता लोकसभेसाठी बाळासाहेब शिवलकर, मोहन जोशी, उल्हास पवार, मी असे अनेक कार्यकर्ते आहे. पक्षाने काय निकष लावून त्याला तिकीट दिल माहित नाही.
आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही पक्षाला विचारणार आहोत. बैठक घेणार आहोत. वरिष्ठांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. हे तिकीट कोणी दिल याचा जाब विचारावा लागेल. राहुल गांधी न्याय यात्रा काढत आहेत. त्यामध्ये निष्ठावन्त लोकांना न्याय मिळणार आहे का असा सवाल बागुल यांनी यावेळी उपस्थित केला. मी ६ टर्म नगरसेवकपदी निवडून आलो. लोकसभेची संधी होती. त्यानं संधी दिली पाहिजे होती. आमच्या मधला शुक्राचार्य त्यांनी शोधायला पाहिजे, तर काँग्रेस बळकट होईल. वाईट वाटलं आमच्या पदाधिकाऱ्यांना. पुण्यात काल कुठं जल्लोष झाला नाही. आम्ही सत्तरीला आलोय तर संधी कधी देणार. आम्ही राहुल, खर्गे याना भेटणार, माझ्या नाराजीने उमेदवार पडणार नाही. पण आमची खदखद आहे. त्यामुळे आम्ही पक्षश्रेष्ठींना जाब विचारणार आहे.
निष्ठावंत लोकांवर अन्याय करून आता विद्यमान आमदारांना तिकीट देऊन काँगेसने काय सध्या केलं हे विचारायच. माझ्यात काही कमी आहे. मी विकास केला नाही. माझ्यामागे कोणी खंबीर नेतृत्व नाही म्हणून तिकीट दिल नाही का? मी कुठं कमी पडलो, माझं काम नाही असं दाखवा ना? मी कुठल्या पक्षावर टीका करून ध्येय धोरण मांडलं. मी काय कमी मला दाखवा आणि थांबवा. मी फोटोसाठी आंदोलने केली नाहीत. काय घोषणा देता तुम्ही. त्यांनी आमदार व्हावं, मंत्री व्हावं. ते आमदार असताना उमेदवारी देणं मला पटत नाही. माझी पूर्ण तयारी आहे. आम्ही सगळी काम केली आहेत. त्यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलला पाहिजे. माझ्या नेत्यांना माझे विचार माहित आहेत. सर्व वरिष्ठांना भेटून माझी कॅपॅसिटी सांगितली आहे. मला आमदार होण्यासाठी ऑफर आली होती. पण निष्ठावंत असल्याने मी कुठेही गेलो नाही.