पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी ओमायक्रॉनचे नवीन ४ रुग्ण आढळले आहेत, परंतु या चारही रुग्णांना कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिका वैद्यकीय विभागाने दिली. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
दोघांची पुन्हा होणार तपासणी
शहरात यापूर्वी आढळलेल्या सहा रुग्णांना शुक्रवारी दहा दिवस झाले. त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यातील चार जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना घरी सोडले आहे, परंतु यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना सध्या रुग्णालयात ठेवले आहे. या दोन्ही रुग्णांची दोन ते तीन दिवसांत पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती नवीन जिजामाता रुग्णालयातून देण्यात आली.
परदेशातून आलेले तिघेच पॉझिटिव्ह
आतापर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या सहवासातील ३४० जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १६० जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. परदेशातून आलेले ११ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील २१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, परंतु परदेशातून आलेल्या तीन जणांचा ओमायक्रॉन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील शहरातील सात जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सद्यस्थितीत शहरात ओमायक्रॉनचे सहा रुग्ण आहेत.
''शुक्रवारी आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. परदेशातून शहरात आलेल्या प्रवाशांचे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सर्वेक्षण सुरू आहे असे महापालिकेचे वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.''