लोणी काळभोर : हुंड्यासाठी विवाहितेच्या छळाचे प्रकार आजही घडत आहेत; मात्र नवऱ्याच्या दोन्ही किडन्यांचा खर्च किंवा किडनीदाता माहेरून आणण्यासाठी येथील एका विवाहितेचा गेली तीन महिने छळ सुरू होता. अखेर तिने तक्रार दिल्यानंतर, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पतीसह, सासरा, सासू, दीर या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.दीपाली गणेश आठवले (वय २६ वर्षे, रा. शिर्के हॉस्पिटलजवळ, उरुळी कांचन, सध्या भाळवणी, ता. पंढरपूर) हिने फिर्याद दिली आहे. त्यावरून तिचे पती गणेश रमेश आठवले, सासरे रमेश पांडुरंग आठवले, सासू मीना रमेश आठवले व दीर महेश रमेश आठवले या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली व गणेश यांचा विवाह १२ जून २0१६ रोजी झाला असून, सर्व खर्च तिच्या वडिलांनी केला होता. असे असताना ती सासरी नांदण्यास आल्या नंतर, तुझ्या वडिलांनी लग्न व्यवस्थित करून न दिल्याने, तिच्याशी वाद सुरू झाला. पतीनेही अबोला धरला. आपल्या पतीच्या किडन्या खराब आहेत, हे दीपालीला माहीत नव्हते. काही दिवसांनी हे तिला माहीत झाले. यास तीच जबाबदार आहे, असे म्हणून हे चौघेही सारखे भांडू लागले व वारंवार गणेश यांच्या दोन्ही किडन्या बदलण्यासाठी होणाऱ्या खर्चाची तिच्याकडे मागणी करून, किडनी बदलण्यासाठी पैसे अथवा माहेरकडील कोणत्याही नातलगाची किडनी जुळते का बघ, असा तगादा लावून वारंवार मानसिक त्रास देत होते. ५ आॅगस्ट रोजी नागपंचमीच्या सणाला तिला नेण्यासाठी वडील आले. तिने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. वडिलांनी आमची परिस्थिती गरीब आहे सांभाळून घ्या, अशी विनवणी केली व तिला गावी घेऊन गेले. ( वार्ताहर )
किडन्यांसाठी नवविवाहितेला पैैशांचा तगादा
By admin | Published: September 09, 2016 1:47 AM