पुणे: लायन्स आणि लियो क्लबच्या वतीने गरजू लोकांसाठी उम्मीद की चादर हा उपक्रम राबवण्यात आला होता. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री, लिओ क्लब प्रांताध्यक्ष हिमांशू सराफ, संदीप खर्डेकर, मंजूषा खर्डेकर आदी उपक्रमात सहभागी झाले होते.
शहरात कोथरूड, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट, येरवडा, हडपसर, पिंपरी-चिंचवड या भागांतील गरजू लोकांना ३ हजार ब्लॅंकेट आणि १३ हजार जुन्या कपड्यांचे वाटप करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला आर्थिक मदत
पुणे: झायन पेंटीकॉस्टल चर्च यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल रुग्णालयाला दहा लाखांची वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यास देणगी देण्यात आली. उपकरणांचे उद्घाटन चर्चचे पाळक डॉ. हिरा मॅथ्यू बुडल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी चर्चचे कार्यकारिणी मंडळ आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य सुशीलकुमार फ्रेडरिक्स, जयचंदन विरण, रॉबर्ट घोरपडे, पूजा आनंद, कार्तिकी हिवरकर, कमलेश चासकर, अभय सावंत आदी उपस्थित होते.