शिवणे : ती किक बाॅक्सिंगची खेळाडू. नुकत्याच उत्तराखंडमधील डेहराडून येथे पार पडलेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय किक बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिची निवड झाली हाेती. वडिलांचा निराेप घेऊन ती डेहराडूनला दाखल झाली. स्पर्धा उद्यावर आली असताना आदल्या रात्री तिला वडिलांच्या निधनाची बातमी समजली. ‘ती’ कोसळली. मात्र प्रशिक्षकांनी ‘तिला’ सावरले. खचून न जाता, सकाळी तिने लढत करूनच घरी जायचे, असा निर्णय घेतला. अटीतटीच्या तीन लढती करीत तिने सुवर्णपदक जिंकले. उत्तमनगरमधील प्रीती सुरेश निकुंभ असे या लढवय्या खेळाडूचे नाव आहे.
उतराखंड डेहराडून येथे दि. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान, १७ वर्षांखालील राष्ट्रीय किक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. यामध्ये प्रीती सहभागी झाली होती. तिचे वडील सुरेश निकुंभ उत्तमनगर येथे अचानक चौकात रस्त्यावर भाजीविक्रीचा व्यवसाय करत होते. लिव्हरच्या आजाराने ते आजारी होते. स्पर्धेसाठी जाताना ‘तिला गोल्ड मिळवून ये’, असे सांगितले होते.
स्पर्धेसाठी निघून गेल्यावर वडिलांची तब्बेत बिघडल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. पहिल्या दिवशी तिने सुवर्णपदक जिंकले. ती माहिती तिच्या वडिलांना दिली. ते आनंदात होते. रात्री उशिरा त्यांचा लिव्हरचा आजार बळावला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. प्रीतीची आई आशा यांनी प्रशिक्षिका कविता दवणे यांना रात्री दोन वाजता तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. ‘तिला लवकर घेऊन या.’असे सांगितले.
वडिलांच्या शेवटच्या शब्दांनी तिला दिले लढण्याचे बळ
वडिलांच्या मृत्यूमुळे प्रीती कोसळली. प्रशिक्षिका दवणे यांनी तिला सावरले. सकाळी तिची दुसऱ्या प्रकारातील लढत होती. तेव्हा वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःला सावरत पुढील स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. सकाळी तिच्या लढती त्रिपुरा, उत्तराखंड व आसाम राज्याच्या संघासोबत झाल्या. टफ स्कोरिंग करून तिने सुवर्णपदक जिंकले. लढत पूर्ण होताच प्रशिक्षिका दवणे आणि ती विमानाने पुण्यात पोहाेचल्या. त्यानंतर वडिलांच्या अंत्यसंस्काराला ती पोचली. एका बाजूला वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले होते. पण ते पाहण्यासाठी ते हयात नव्हते. ते दुःख सावरताना अनेकजण हळहळले. सुवर्णपदक जिंकून तिने आपले पदक वडिलांना अर्पण केले.
प्रीतीला एनडीएमध्ये व्हायचे आहे भरती
प्रीती सध्या दहावी शिकते. खेळात यश मिळवून सरकारी नोकरी करायचे तिचे स्वप्न आहे. जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा हे प्रीतीचे मूळ गाव आहे. उत्तमनगरला आठ वर्षांपासून राहतात. मागील सहा वर्षांपासून कराटे किक बॉक्सिंग शिकते. लहान भाऊ पाचवीत आहे. आता आई व आजी रुखमाबाई भाजीविक्री करून घर चालवत आहे.