पुणे महापालिकेचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच : खासदार सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 03:35 PM2021-01-13T15:35:56+5:302021-01-13T15:58:03+5:30
अजितदादा सध्या पालकमंत्री असून ते पक्ष भेद न करता पुण्यासाठी भरघोस निधी आणतील.
पुणे (वारजे ) : पुणे महानगरपालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष जरी बाकी असले तरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांसह सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणले. त्यात उपमुख्यमंत्री व पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या गळयात पडली. आणि भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता परत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा महापालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेचा पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल, असे ठाम मत व्यक्त केले आहे. .
वारजे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते जॉगिंग ट्रॅक व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, लक्ष्मी दुधाने, सायली वांजळे-शिंदे आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, सध्या ईडीची नोटीस देऊन राजकारण करण्याचा प्रघात असला तरी आम्ही तसे वागत नाही. अजितदादा सध्या पालकमंत्री असून ते पक्ष भेद न करता पुण्यासाठी भरघोस निधी आणतील व शेवटच्या वर्षात विकासकामांना भरपूर निधी उपलब्ध होईल. तसेच मनपा निवडणुकीला अद्याप एक वर्ष अवकाश असला तरी मी जबाबदारीने सांगते की, पुणे महानगरपालिकेचा पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल, असे ठाम मत व्यक्त केले.
दिलीप बराटे म्हणाले, या भागात मागील २० वर्षात सतत मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. २३ गावांचा समावेश व गुंठेवारी कायदा हे जिवंत उदाहरण आहे. मात्र अहिरेगावातील रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
सायली वांजळे म्हणाल्या, मी बोलण्यापेक्षा काम करण्यावर भर देणारी आहे. लग्नानंतर कौटुंबिक सहकार्यानेच रोज प्रभागात उपलब्ध असते.
कर्तृत्वान मुलगी
सायली ही कर्तृत्ववान रमेश वांजळे यांची कर्तृत्ववान मुलगी आहे. लग्न झाल्यावरही घर व लहान मुलाला सांभाळत ती प्रत्येक बैठकीला आवर्जून उपस्थित असते याचे सुळे यांनी कौतुक केले.