पुणे : यंदाच्या हंगामात गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील हंगामात तर तब्बल सव्वाशे लाख टन इतक्या प्रचंड प्रमाणात साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने साखर उद्योग क्षेत्र धास्तावले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामाचा विचार करण्याचे महत्त्वाचे काम मंत्री गटाच्या समितीला देण्यात आले आहे. साखर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात साखरेचे नियोजन करण्यासाठी मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. या मंत्रिगटासमोर साखर क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसह पुढील हंगामाला कसे सामोरे जायचे यासंदर्भात महत्त्वाचे विषय देण्यात आले आहेत. या वर्षी ९ लाख २ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात १०१ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखाने सुरु होते. त्यातील ४१ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात, २१ मार्च अखेरीस ८७२.११ लाख टन ऊस गाळपातून सुमारे ९७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अजूनही ७५ टक्के कारखाने सुरु आहेत. त्यामुळे कमीत कमी साखरेचे उत्पादन १०६ लाख टनांवर जाईल असा अंदाज आहे. पुढील वर्षी २०१८-१९च्या हंगामासाठी १० लाख ८७ हजार हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल. त्यामुळे त्या हंगामात १२५ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सलग दोन वर्षे साखरेचे प्रचंड उत्पादन झाल्यास भाव गडगडून साखर उद्योग अडचणीत येण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रीगटाला पुढील हंगामाची तयारी करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यात पुढील हंगाम आॅक्टोबर महिन्यातच सुरु करता येईल का ? तसेच बंद कारखाने सुरु करण्याबाबत निर्णय घेणे, महाराष्ट्राबाहेर साखर विक्रीसाठी अनुदान देणे अशा प्रश्नांवर चर्चा करुन शिफारसी पाठविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारने घोषित केल्यानुसार, राज्यात उत्पादित झालेली १० लाख टन साखर ३२०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मार्केंटिग फेडरेशन खरेदी करेल हा महत्त्वाचा विषय देखील समितीच्या कार्यक्रमपत्रिकेत देण्यात आला आहे. ऊस तोडणी यंत्र आणि ठिबक सिंचनाच्या अनुदानात वाढ करण्याच्या निर्णयाचा देखील यात समावेश असल्याची माहिती साखर संघातील सूत्रांनी दिली. ....................साखरेचे उत्पादन झाले होते. त्यावेळचे ते दहा वर्षांतील सर्वाधिक उत्पादन होते. गेल्या हंगामात (२०१६-१७) दुष्काळामुळे अवघ्या ३७३.१३ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते. त्यातून नीचांकी ४२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा १०६ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आहे. हा आकडा गाठल्यास ते सर्वोच्च साखर उत्पादन होईल..............
पुढील साखर हंगामाचा मंत्री समिती करणार अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 8:58 PM
साखर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात साखरेचे नियोजन करण्यासाठी मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे.
ठळक मुद्देसंकट अति उत्पादनाचे : मंत्री गट समितीच्या निर्णयावर ठरणार साखर उद्योगाची दिशा यंदाच्या हंगामात १०१ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखाने सुरु ऊस तोडणी यंत्र आणि ठिबक सिंचनाच्या अनुदानात वाढ करण्याच्या निर्णय