पुणे - महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. चंद्रकांत पाटलांनी मला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली असल्याचं ते म्हणाले होते. मुश्रीफांच्या या दाव्यावर चंद्रकांत पाटलांनी खुलासा करत प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफांना मी अशी कोणतीही ऑफर दिली नव्हती. त्यांनी ड्रामा करणं बंद करावं असं पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच, कायद्याची लढाई कायद्यानं लढा, असे म्हणत येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या 2 नेत्यांचेही विषय बाहेर येणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी एकप्रकारे गौप्यस्फोटच केला आहे. अनेकांना असं वाटतंय की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडतायंत. पण, दोन काँग्रेसचीही नावं आली आहेत. येत्या दोन दिवसांता त्यांचीही नावे समोर येतील, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे.
आमच्या रडार अन्याय आहे, भ्रष्ट्राचार आहे, महिलांना त्रास देणारे आहेत, त्यात योगायोगाने जावई आहेत, त्याला आम्ही काय करणार. त्यामुळेच, हेही स्पष्ट केले की आमच्या रडावर केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेना नसून येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्या मोठ्या दोन मंत्र्यांचेही विषय बाहेर येतील, असे पाटील यांनी सांगितले.
मुश्रीफांना कोणतीही ऑफर दिली नाही
पाटील म्हणाले, हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात कुणालाही त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा असं त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. मुश्रीफ यांना सांगायचंय पॅनिक होऊन काही होत नसत. कारवाई झाल्यानं आणि घोटाळे बाहेर पडत असल्याने मुश्रीफांचा ड्रामा सुरु आहे. अमुक-तमुक करणार, माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, कुठलीतरी परिस्थिती दाखवायची, मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना दिलं आहे.
माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही
माझं आंबाबाईला साकडं आहे की मुश्रीफ बरे झाले पाहिजे, त्यांनी पॅनिक नको व्हायला हसन मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझ्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली पण ते माहिती देत देत सहकुटुंब गायब झाले. तसाच मार्ग मुश्रीफ यांच्याकडे असल्याचं ते म्हणाले आहेत.
मला भाजपमध्ये येण्याची ऑफर – हसन मुश्रीफ
चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले होते.