पुणे : शहरात शनिवारी आणि पुढील दोन-तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. दुपारी आकाश निरभ्र आणि सायंकाळनंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी ११ ते दुपारी अडीचपर्यंत तापमानाचा पारा वाढलेला असेल, तेव्हा घराबाहेर पडू नये, अशी सूचना हवामान खात्याने केली आहे. दोन दिवस अलर्ट जारी केला आहे.
शहरात शुक्रवारी सायंकाळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. पुणे शहर व जिल्ह्यात आकाशात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवसांमध्ये पुणे व परिसरात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, हलक्या स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
झाडाखाली थांबू नका
हवेच्या कमी दाबाचा पट्टा हा केरळपासून छत्तीसगडपर्यंत निर्माण झालेला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो. विजांचा कडकडाट होऊन त्या कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो, झाडांच्या खाली उभे राहू नये, तसेच वीज चमकताना मोबाइलचा वापर करू नये, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.