पुणे : दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत न्यायालयाने कैकवेळा फटकारले, तरी यंदाचे शैक्षणिक वर्ष संपत आल्याने शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षी त्यावर फुलीच मारण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे कारण पुढे करत आता या वर्षी कोणतीही तपासणी होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सांगितले. दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर नुकतीच सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने पुन्हा एकदा राज्य शासनाला फटकारत दप्तराचे ओझे केव्हा कमी होणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर ओझे कमी करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाची मर्यादा काय आहे? अनुदानित शाळांना तो लागू आहे का? याबाबत शासनाला विचारणा केली आहे. याबाबत शासन आपली बाजू न्यायालयात मांडेलच. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे विभागांतर्गत दप्तराची तपासणी झालेलीच नाही. याबाबत पुणे विभागीय उपसंचालक रामचंद्र जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, की परीक्षा काळात तपासणी करता येणार नाही. आता थेट पुढील शैक्षणिक वर्षात ही तपासणी होईल, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पुणे विभागीय उपसंचालकांनी केवळ तीन वेळा ही तपासणी केली आहे. वास्तविक पाहता शिक्षणाधिकारी व गटशिक्षण अधिकारी, तसेच शिक्षण मंडळातील अधिकारी यांनी दर महिन्याला आपल्या विभागातील काही शाळा निवडून महिनाभरात कधीही ती तपासणी करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्ष तसे होताना दिसत नाही. दप्तराच्या ओझ्याची तपासणी आजपर्यंत तीन वेळा करण्यात आली. मात्र, सध्याचा काळ हा परीक्षेचा काळ असल्याने अनेक शाळांमध्ये परीक्षा सुरू झाल्या आहेत. तर, काही शाळा या अभ्यासासाठी बंदही आहेत. या काळात दप्तराचे ओझे तपासणे शक्य होणार नाही. म्हणूनच पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्यापासून पुन्हा तपासणीला सुरुवात केली जाईल. - रामचंद्र जाधव, विभागीय शिक्षण उपसंचालक
आता पुढच्याच वर्षी दप्तराच्या ओझ्याची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2016 3:14 AM