लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दरवर्षी शाडूची किंवा मातीची मूर्ती तयार करायची असेल, तर त्यासाठी नवीन ठिकाणाहून माती आणली जाते. परंतु, हे होऊ द्यायचे नसेल तर पुनरावर्तन मोहिमेत पुणेकरांनी सहभागी व्हावे. त्यामुळे दरवर्षी माती आणायची गरज पडणार नाही आणि यंदा दिलेल्या मूर्तीपासूनच पुढील वर्षी बाप्पा तयार केले जातील. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि शाश्वत उपक्रमदेखील सुरू राहील. ही मोहीम तीन वर्षांपासून सुरू झाली आहे.गेल्या वर्षी २०२२ साली पुनरावर्तन मोहिमेद्वारे २३ हजार किलो शाडू माती नागरिकांकडून गोळा करून मूर्तिकारांना पुनर्वापरासाठी दिली गेली. शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर ही माती पुणे शहरातील नागरिकांना आवाहन करून त्यांच्याकडून ५० ठिकाणी गोळा केली गेली.
जेव्हा इकोएक्झिस्ट फाउंडेशनने २०२० मध्ये पुनरावर्तन मोहिमेचा प्रारंभ केला, तेव्हा त्यांनी शाडू माती, जी विसर्जित झाल्यानंतर नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये या मातीचे साठे जमा होतात आणि जे एक नूतनीकरण न करता येणारे साधन आहे, त्याच्या पुनर्वापर करण्याच्या क्षमतेवर प्रयोग करण्यास सुरुवात केली. शहरातील २०हून अधिक संस्थांनी २०२२ मध्ये १५० सोसायट्या आणि २०० हून अधिक स्वयंसेवकांना मोहिमेत सामील करून घेत ही मोहीम वाढवली.सीईई, स्वच्छ, सोशल सेवा इनिशिएटिव्ह, जीवित नदी, ऑयकॉस, पूर्णम इकोव्हिजन, ग्लोबल शेपर्स, स्टुडिओ अल्टरनेटिव्ह, पर्यावरण संरक्षण गतिविधी, कमिन्स फाउंडेशन, स्वच्छ पुणे स्वच्छ भारत, फर्ग्युसन कॉलेज या काही संस्थाही यात सहभागी झाल्या. पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि नाशिकमध्येही ही मोहीम छोट्या स्तरावर राबवण्यात आली.
देशभरात पहिलाच प्रयाेगनैसर्गिक चिकणमाती, शाडूमातीचे संकलन आणि पुनर्वापर करण्याचा हा संपूर्ण देशात अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे आणि तो या वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेल्या मूर्तिकारांसोबतच्या बैठकीत सादर करण्यात आला. या मोहिमेला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. - वृंदा शेटे, प्रकल्प प्रमुख, इको एक्झिस्ट फाउंडेशन