पुणे : अपंगत्वाचे सोंग घेऊन भिक्षा मागणा-या एका महिलेसह साथीदारांची तोतयेगिरी कोंढव्यातील एका सामाजिक संस्थेने उघडकीस आणली. व्हिलचेअरवर बसून पदरात लहानग्याला घेऊन लोकांची सहानुभूती मिळवून पैसे उकळत असतानाच या महिलेला पकडण्यात आले. दोन्ही पाय नसल्याचा तिचा बनाव उघडकीस येताच व्हिलचेअरवर बसलेली ही महिला साथीदारासह बाळाला घेऊन पसार झाली. ही घटना कोंढव्यामध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. कोंढव्यामध्ये फ्यूचर फाऊंडेशन या संस्थेचे कार्यालय आहे. समिना शेख, शबाना कॉन्ट्रॅक्टर, शायनाज शेख या पदाधिकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये बसून काम करीत होत्या. त्यावेळी कार्यालयाजवळून स्पिकरवर आवाज येऊ लागला. ‘या महिलेला मदतीची गरज आहे. तिला पती नाही, दोन लहान मुले आहेत. मदत करा.’ अशा आशयाचे आवाहन स्पिकरवर वाजत होते. समिना, शबाना आणि शायनाज यांनी बाहेर जाऊन पाहिले असता एका व्हिलचेअरवर बसून एक महिला भिक मागत होती. तिच्या मांडीवर एक लहान बाळ होते. तर, ही व्हिलचेअर 20 वर्षांचा एक युवक ढकलत असल्याचे दिसले. या महिलेच्या मांडीवर चादर पांघरलेली होती.व्हिलचेअरला भोंगा बसविण्यात आलेला होता. टेपरेकॉर्डर लावून त्यावर मदतीचे आवाहन असलेली कॅसेट सुरु होती. इमारतीमधील रहिवासी आणि वाहनचालक थांबून या महिलेला आर्थिक मदत करीत होते. या सर्व प्रकाराबाबत कार्यकर्त्यांना संशय आला. त्यांनी थांबून महिलेकडे चौकशी केली असता तिने तिचे नाव राना खातून सांगितले. तर तिच्या सहका-याचे नाव मोहम्मद आलम असल्याचे सांगितले. तिला पायावरील चादर काढण्यास सांगितले असता तिने नकार दिला. कार्यकर्त्यांनी ही चादर दूर केली असता तिला पाय असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिने पोलिओ झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना बोलावण्यात येत असल्याचे समजताच ही महिला बाळाला घेऊन चालू लागली. आपल्यावर कारवाई होईल या भितीने ही महिला, तिचा सहकारी बाळाला घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार तासभर सुरु होता. पोलिसांना कळवूनही त्यांनी कारवाई न केल्याचे समिना शेख यांनी सांगितले.
एनजीओच्या कार्यकर्त्यांनी पकडले तोतया भिक्षेकरी, कोंढव्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 10:30 PM