खेड शिवापूर (पुणे) : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गच्या लगत संपादित जागांवरील अतिक्रमणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या सर्व अतिक्रमणामुळे सेवा रस्ते अनेक ठिकाणी अरुंद झाले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अनेक ठिकाणी टपरीवाले व छोटे दुकानदारांनी मुख्य रस्ता व सेवा रस्त्याच्या मध्ये आपली दुकाने लावून व्यवसाय थाटले होते. या ठिकाणच्या अतिक्रमणावर आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कारवाई केली.
या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अनेक वाहने मुख्य रस्त्यावर लावली जात होती. अपघात होणे ही बाब नित्याचीच झाली होती. मुख्य रस्त्याबरोबरच सेवा रस्त्याच्या शेजारीच असलेले हॉटेल्सवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर ती सेवा रस्ता अडवला होता. आज (गुरुवारी) सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने टोलनाक्यावर सेवा रस्त्यावरील संपादित जागेवरील अतिक्रमण पोकलेन, जेसीबीच्या साह्याने काढण्यास सुरुवात केली.
या कारवाईमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अंकित यादव उपव्यवस्थापक तांत्रिक विभाग भूसंपादन विभागाचे एल एल पाटील पोलीस प्रशास वतीने पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांच्याबरोबर वीस पोलिसांचा फौजफाटा होता. त्याचबरोबर महामार्ग पेट्रोलिंग पथक आपल्या दहा अभियंत्यांच्यासह बारा कर्मचारी, पोकलेन, 2 जेसीबी क्रेन व इतर लवाजम्यासह कारवाईत सहभागी झाले होता. साडे सदतीस मीटरपर्यंत जमीन संपादित केली होती. मात्र अचानकपणे आज हद्दीच्या खुणा ह्या पाच मीटर वाढवून साडे 42 मीटर पर्यंत करण्यात आले. याची जर पूर्व सूचना दिली असती आमचे नुकसान टाळता आले असते अशी प्रतिक्रिया स्थानिक हॉटेल व्यावसायिकाने दिली.