रस्त्याचे काम सुरु न झाल्यास
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
काटेवाडी :बारामती तालुक्यातील ढेकळवाडी ते भवानीनगर रस्त्याची अवस्था ' जायला न्हाय रस्ता, गाव खांतय खस्ता, अशी झाली आहे . रस्त्याचे काम सुरु न झाल्यास ग्रामस्थांनी २० सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
ढेकळवाडी येथील ग्रा.मा. ५८ गावठाण ते जाचक वस्ती हा रस्ता रहदारीचा आहे.हा रस्ता गेल्या १०० वर्षांपासून वहिवाटीचा तसेच साखर कारखाना व इंदापूरकडे जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. यासाठी पर्यायी दुसरा रस्ता उपलब्ध नाही.त्यामुळे ढेकळवाडीसह वाडीवस्त्यांवरील ग्रामस्थ, विद्यार्थी, साखर कामगार, ऊस वाहतूक वाहने, बैलगाड्या यांची मोठी वर्दळ या रस्त्यावर आहे; मात्र ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीसाठी रस्ता खडतर बनला आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवस होऊन मार्गी लागला नाही. त्यामुळे निधी पडूनसुद्धा रस्ता होत नाही यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.त्यामुळे रस्त्याचे काम सुरु करण्याच्या कामासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे.प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.यावेळी माजी सरपंच बाळासोा बोरकर, शिवाजी लकडे, सुभाष ठोंबरे, संपतराव टकले, उपसरपंच शुभम ठोंबरे,रामदास पिंगळे, नामदेव ठोंबरे, संजय टकले आदी उपस्थित होते.
...तर चिखलातून गाड्या
पळविण्याची स्पर्धा घेणार
तालुक्याचे लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ कोटी रुपये या रस्त्यासाठी दिलेले आहेत, परंतु अजूनही काम सुरू नाही.अधिकारी वर्ग बघ्याची भूमिका घेत आहेत, त्यामुळे ढेकळवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास २० तारखेला खडतर झालेल्या रस्त्यावर प्रतीकात्मक आंदोलन म्हणून चिखलातून गाड्या पळविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला ३००० रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे असे येथील ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर यांनी सांगितले.
ढेकळवाडी ते भवानीनगर रस्त्याचे काम सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना देताना ग्रामस्थ.
१४०९२०२१ बारामती—१५