पुणे : महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा स्तर उंचविण्यासाठी स्वतंत्र ‘सिटी हेल्थ प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत महापालिकेच्या पाच रुग्णालयांत नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) सुरु करण्यात येणार आहे. एनआयसीयूमधील अद्ययावत सुविधांमुळे नवजात अर्भकांना जीवदान मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस भवानी पेठेतील कै.चंदुमामा सोनवणे प्रसूतिगृह आणि येरवडा येथील भारतरत्न स्व.राजीव गांधी रुग्णालयात हे विभाग रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यासाठी महापालिका, मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. परंतु अनेक वेळा प्रसूती झालेली महिला व नवजात अर्भक यासाठी अतिदक्षता सुविधेची गरज लागल्यास अडचण निर्माण होते. यामुळेच यंदाच्या अंदाजपत्रकात खास तरतूद करून शहरातील ४ महापालिका रुग्णालयांमध्ये एनआयसीयू सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात नवजात अर्भक अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. मात्र एका रुग्णालयाच्या व्यवस्थेवर बऱ्याचदा ताण येतो. अनेकदा रुग्णांची गैरसोय होते.ही गैरसोय लक्षात घेऊन चार रुग्णालयांमध्ये हे एनआयसीयू सेंटर सुरु करण्यात येणार आहे. यापैकी सोनावणे प्रसूतिगृह आणि स्व. राजीव गांधी रुग्णालयातील काम पूर्णत्वास गेले असून एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा विभाग खुला होणार आहे. पुढील वर्षी डॉ. दळवी रुग्णालय, शिवाजीनगर आणि कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह, कोथरूड या रुग्णालयांमध्ये एनआयसीयू उभारले जाणार आहे.सोनावणे आणि राजीव गांधी रुग्णालयांसाठी सुमारे २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रुग्णालयांमधील एनआयसीयूमध्ये प्रत्येकी १२ खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी खर्च होणाºया निधीपैकी ५० टक्के खर्च महापालिकेतर्फे तर ५० टक्के खर्च मुकुल माधव फाउंडेशनतर्फे उचलण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी ८ डॉक्टर आणि २९ परिचारिकांना ससून जनरल हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि भारती हॉस्पिटल यांसारख्या रुग्णालयांत विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. रुग्णालयांमध्ये एनआयसीयूकार्यरत झाल्यानंतर नवजात बालकांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय शुश्रूषा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल.गरिबांसाठी लाभदायकआपल्या देशामध्ये बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नवजात अर्भकांना बºयाचदा अद्ययावत उपचार उपलब्ध होत नाहीत. गरिबांचा विचार फारसा कोणी करत नाही.ही अडचण लक्षात घेऊन पुणे शहराच्या चार टोकांना असलेल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये एनआयसीयू उभणारण्यासाठी फिनोलेक्स आणि त्याच्याशी संलग्न मुकूल माधव फाऊंडेशनतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.त्यापैकी दोन रुग्णालयांतील विभाग लवकरच रुग्णांसाठी खुले होतील. पुढील काळात औंध सार्वजनिक रुग्णालयांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.सोनावणे प्रसूतिगृह आणि राजीव गांधी रुग्णालयांमध्ये एनआयसीयूचे काम वेगाने सुरू आहे. हा विभाग प्रत्येकी १२ खाटांचा असून, अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असणार आहे. या विभागासाठी महापालिका आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ५०-५० टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. इतर रुग्णालयांचे काम पुढील वर्षी सुरू होणार आहे.- डॉ. संजय वावरे,सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका
पाच पालिका रुग्णालयांत एनआयसीयू ; सीएसआरअंतर्गत निधी, नवजात अर्भकासाठी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 3:12 AM