पुणे, दि. 16 - शहरातील अनेक हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप, एटीएम मशिन येथे स्कीमर बसवून डेबीट आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळवत कार्डचे क्लोनिंग करून आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली होती. या गुन्हयांमध्ये आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे समोर आल्यानंतर केलेल्या तपासात नायजेरियन टोळीच्या म्होरक्यास आणि त्याच्या साथीदाराला सायबर क्राईम सेलने बँगलोर येथून अटक केली. इरमेन स्मार्ट ( नं 42 शारदा नीलया अपार्टमेंट , बँगलोर) आणि इर्शाद सत्तार सोळंकी ( रा. गोपीभाई नेमसिंग बंद्रेकर वाडी, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी या गुन्हयात ओग्बेहसे फॉर्च्युनर, बशर डकीन गरी उस्मान आणि इफिनयी माईक मबेज या नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हयातील मुख्य सूत्रधार आरोपी हा मुंबई व बंगळुरू या शहरांमध्ये नेहमी ठिकाणे बदलून राहात असल्याने त्याला पकडण्यासाठी सायबर क्राईम सेलद्वारे मुंबई व बंगळुरू मध्ये सापळे लावले होते. मुख्य आरोपी हा बंगळूरू मध्ये असल्याची माहिती मिळाल्याने एक पथक हे बंगळुरूला रवाना झाले आणि स्मार्ट याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 मोबाईल, 2 लँपटॉप व 1 लाख 65 हजार रूपये जप्त करण्यात आले. या आरोपीविरूद्ध बंगळुरू, कर्नाटक येथे 11 गुन्हे दाखल असून, त्यातील 4 गुन्हयात तो पाहिजे आरोपी आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, तामिळनाडू अशा अनेक ठिकाणी स्किमर लावून डेबिट कार्ड क्लोन केल्याचे सांगितले आहे. या आरोपीला एटीएम मशीनद्वारे पैसे काढून देणे तसेच कमिशनवर विविध लोकांची बँक अकाऊंट देण्याचे काम सोळंकी करीत असल्याचे समोर आले आहे. या दोघांकडून अजूनही गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. सायबर सेलचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक गवते, पोलीस उपनिरीक्षक मस्के, औटी, पोलीस कर्मचारी दीपक भोसले, अस्लम अत्तार, किरण अब्दागिरे, आदेश चलवादी, शिरीष गावडे आणि नवनाथ जाधव या पथकाने ही कारवाई केली.
आर्थिक फसवणुकीप्रकरणी नायजेरियन टोळीच्या म्होरक्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 10:59 PM