- लोकमत न्यूज नेटवर्क
बिबवेवाडी : राज्यशासनाने १७ मे रोजी काढलेल्या आदेशामुळे रात्र शाळेला असलेल्या शाळेत अर्धवेळ नोकरी करणाऱ्या शिक्षकांना यापुढे रात्रशाळेत शिकवता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १७६ शाळेतील १,३५८ शिक्षकांच्या नोकरीवर गदा आल्याचा आरोप रात्रशाळा महासंघाने केला आहे. ३० हजारहून अधिक विद्यार्थी या रात्रशाळेत शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थांना कामामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे दिवसा शिकता येत नाही, असे विद्यार्थी या शाळेत शिकत असतात. या शाळेत शिकण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते. दररोज रात्री किंवा सायंकाळी साडे तीन तास ही शाळा चालवली जाते. पुण्यात पाच रात्रशाळा असून त्या पैकी एक शाळा पुणे महानगरपालिकेकडून चालवली जाते. यातील एक शाळा ही इंग्रजी माध्यमातून चालवली जाते. सुमारे १०० वर्षांपासून आपल्या देशात या रात्रशाळा सुरूआहेत. इतर शाळेत शिकवणारे शिक्षकच या शाळेत शिकवण्याचे कार्य करीत आहेत. भाजपा सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवसा शिकवणाऱ्या शिक्षकांना यापुढे रात्र शाळेत शिकवता येणार नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे १,३५८ शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली आहे. या संदर्भात शासनाने निर्णय बदलला नाही तर उपोषण व न्यायालयीन लढा देणार असल्याचे रात्रशाळा महासंघाच्या वतीने प्राचार्य संजय सातपुते, पूना नाईट स्कूलचे प्राचार्य गंगाधर रासगे, चिंतामणी रात्र प्रशालेचे प्राचार्य संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिक्षण विभागात गेली अनेक वर्ष विनाअनुदान तत्वावर बिनपगारी शिक्षक नोकरी करत होते. तेव्हा त्यांना वेतन देण्याचा विचार शासनाने का केला नाही. या निर्णयामुळे १,३५८ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. त्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी राज्यसरकाने सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.- एस. एस. कोड (शाळेची संहिता) प्रमाणे शिक्षकाला एक पूर्ण वेळ व एक अर्धवेळ काम करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तरी शासनाच्या या निर्णयामुळे या शिक्षकावर हा अन्याय झालेला आहे. या शिक्षकापैकी अनेक शिक्षक हे तोडक्या मानधनावर विनाअनुदानित संस्थेत काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचा तर संसारच रस्त्यावर येण्याची भीती निर्माण झाली आहे.