रात्री अकरानंतरही दुकाने सुरू : नागरिकही फिरतात विनामास्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र जमावबंदी लागू केली आहे. मात्र, काही प्रमुख चौकांत जमावबंदी नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संचारबंदी लागू केली होती. नियमात बदल करून जमावबंदी लागू झाली. या नियमांत पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र दिसल्यास कारवाई केली जाते.
तसेच अत्यावश्यक सेवांना या नियमातून वगळण्यात येते. परंतु, रात्री अकरानंतर सर्वच बंद आहे. या नियमात बदल झालेला नाही. शहरात फर्ग्युसन रस्त्यावर आइस्क्रीमची दुकाने रात्री अकरानंतरही चालू होती.
चौकट
शिवाजीनगर एसटी स्टँड
शिवाजीनगर एसटी स्टँड चौकात चहा, अंडा भुर्जी, वडापाव, सामोसा या पदार्थांच्या गाड्या चालू होत्या.
रस्त्यावर खासगी ट्रॅव्हल उभ्या होत्या. आजूबाजूला रिक्षावालेही उभे होते. चौकातील ८० टक्के लोकांनी मास्क घातले नव्हते.
चौकट
पुणे स्टेशन
पुणे स्टेशनवर अनेक प्रवासी रात्रीच्या वेळेस येतात. त्यांनी मास्क न घातल्याचे चित्र दिसून आले. तसेच चहा, नाष्टाच्या गाड्या चालू होत्या. नागरिक पानटपरीच्या बाहेर विनाकारण थांबल्याचे चित्र होते.
चौकट
स्वारगेट चौक
स्वारगेट चौकात बऱ्यापैकी शांतता दिसून आली.
खासगी ट्रॅव्हल आणि रिक्षाचालकांची वर्दळ होती. या ठिकाणीसुद्धा अनेक नागरिक विनामास्क फिरत होते.
चौकट
कात्रज चौक
कात्रज चौकात कात्रज पोलीस चौकी असल्याने नियमांचे पालन होत असल्याचे चित्र दिसून आले. जमावबंदीच्या नियमानुसार चौकात शांतता होती.
रात्री पोलीस दिसतात का ?
शहरातील रस्त्यावर आणि प्रमुख चौकात पेट्रोलिंग पोलिसांच्या फेऱ्या चालू असतात. प्रमुख चौकात पोलीस दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिक विनामास्क फिरत होते.