रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली असली तरी जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या नीरेत रात्री बारापर्यंत काही आस्थापने बिनदिक्कतपणे उघडी असतात. त्यामुळे नीरेत जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.
एरवी किराणा व्यावसायिक रात्री आठ साडेआठ वाजताच दुकाने बंद करत. मात्र लाॅकडाऊननंतर बहुतेक किराणा व्यावसायिक रात्री साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत तर एक किराणा व्यावसायिक तर चक्क साडेदहापर्यंत किराणा दुकान उघडे ठेवून ग्राहकांची वाट पाहत असतात. पानटपऱ्या, आईस्क्रीम पार्लर व चायनीज गाडे दिवसभरानंतर रात्रीही जोमात सुरू असतात. काही टपरीचालक वेळेत बंद करतात, मात्र काही महाभाग रात्री चक्क बारा वाजेपर्यंत आपले दुकान थाटून बसतात. या टपऱ्यांसमोर मोठ्या संख्येने प्लॅस्टीकच्या पुड्या व कागदी कचरा पडलेल्या असतो. रात्री दहानंतर नीरा परिसरातील गावतील युवक या टपऱ्यांवर अश्लील भाषेत मोठ्या आवाजात दंगा करत असतात.
नीरेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बुवासाहेब चौकादरम्यान हातगाड्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी बनावट व आरोग्यास धोकेदायक आईस्क्रीम विक्रीचे गाडे रंगीबेरंगी लाईटिंगने सजवून रस्त्यात लावले जात आहेत. उन्हाळा सुरु झाल्याने लोक रात्री आइस्क्रीमचा स्वाद घण्यास बाहेर पडत आहेत. या वेळी मास्क वापरला जात नाही. चायनीज खाद्यपदार्थांचे गाडे, रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत सर्रास उघडी असतात. तर आईस्क्रीम पार्लर रात्री बारा वाजेपर्यंत उघडी असतात. ग्राहक सध्या कोरोनाच्या भीतीने फिरकत नसले तरी हे गाडेवाले रात्री उशिरापर्यंत वाट बघत असतात.
मोबाईल शाॅपी रात्री दहा वाजेपर्यंत सुरु असतात. मोबाईल शाॅपी समोर सतत वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केलेली असतात. अत्यावश्यक असलेले दवाखाने, मेडिकल रात्री नऊच्या आधी बंद असतात, तर अत्यावश्यक नसलेली दुकाने रात्री जोर धरत आहेत. नीरा बारामती रोडवरील एका चायनीज सेंटरवर दोन गटात मोठ्या आवाजात वाद झाला.