पुणे :पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला (ता. वेल्हे) या राज्य संरक्षित स्मारक परिसरात पर्यटकांना रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी केली आहे. या बंदीच्या आदेशानुसार राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या क्षेत्रात पर्यटकांना तसेच कोणत्याही व्यक्तीस रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी करण्यात आली आहे. या आदेशाची प्रत स्मारकाच्या दर्शनी भागावर फलकावर लावण्यात आली आहे.
राजगड किल्ल्यावर रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पर्यटक लोक मुक्कामी राहत असल्याने होते. त्यावेळी ते तिथे भोजन बनवून अनुषंगिक कचरा किल्ल्यावरच फेकून देत होते. तसेच महत्त्वाच्या वास्तूंच्या आडोशास शौचास बसत असल्यामुळे व या सर्व बाबींमुळे किल्यावर घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य वाढले होते. यामुळे स्मारकाच्या पावित्र्याला धोका पोहचल्याने या स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस पर्यटक / लोक यांना मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.