लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार यांना ३१ डिसेंबरच्या रात्री पावणेअकरापर्यंतच व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये असेही पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे़ यामुळे यंदा हॉटेलांमध्ये नववर्षाचे स्वागत ‘डीजे-डान्स’ शिवाय करावे लागणार आहे.
महापालिकेच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, बार आदी आस्थापना तसेच आयोजकांविरोधात ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५’ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने बुधवारी (दि. २३) सांगितले.
महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश बुधवारी काढले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच थांबावे. नववर्षाचे स्वागत सर्वांनी घरीच साधेपणाने करावे, असे या आदेशात म्हटले आहे. शहरातली उद्याने, मोकळी मैदाने, पर्यटनस्थळे तसेच रस्ते आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये़ गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम जसे की मिरवणुका, नाच-गाणी वगैरे कोणीही आयोजित करू नये. फटाक्यांची आतिषबाजी करू नये, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे़
बार, रेस्टॉरंट आदी खाण्यापिण्याची सर्व ठिकाणांना ३१ डिसेंबरच्या रात्री पावणे अकरानंतर टाळे लागले पाहिजे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर रात्री पावणे अकरानंतर ‘होम डिलेवरी’ सुविधा देखील बंद करण्यास सांगण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (१ जानेवारी) बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जातात. या धार्मिक स्थळांवर शारीरिक अंतर आणि निर्जंतुकीकरणाचे सर्व नियम पाळले जावेत, स्वच्छतेची खबरदारी घ्यावी, असे महापालिकेने म्हटले आहे.