लोणी काळभोर : दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. या तब्लिगी ए-जमातच्या कार्यक्रमात कदमवाकवस्ती ग्रामपंचायत परिसरातील ३ जण सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. याचबरोबर या परिसरात चेन्नई येथून ३ तर नेपाळ येथून १ जण आलेला आहे. या सर्वांची तपासणी करण्यात आली असून त्यांना कोणताही त्रास होत नाही. या सर्वांचे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कदमवाकवस्ती हद्दीत ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. रतन काळभोर व त्यांचे सहकारी नागरीकांची तपासणी करत आहेत. त्यांना तपासणीत ९ जण संशयित आढळून आले. त्यांतील ३ जण दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तब्लिगी ए-जमात या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांत सहभागी झाले होते. तर ३ जण चेन्नई येथून व नेपाळ येथून १ जण आलेला आहे असे समजले. डॉ. रतन काळभोर यांनी या सर्वांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधला. व आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांना सदर माहिती दिली. डॉ. जाधव यांनी सर्वांची तपासणी केली. त्यावेळी आजअखेर त्यांना कोणताही त्रास होत नाही हे लक्षात आले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ९ पैकी ७ जणांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तब्लिगी ए-जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमानत हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तब्लिगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमात पुणे परिसरातील ९२ जण सहभागी झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी ३५ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यामध्ये पिंपरी - चिंचवड शहरातील तब्बल ३२ नागरिक सहभागी झाल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आणखी १८ नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले तीन जण याचबरोबर चेन्नई येथून आलेले ३ व नेपाळ वरून आलेला १ अश्या एकूण ७ नागरीकामध्ये सध्या तरी कोरोनाची लक्षणे आढळुन आलेली नाहीत. मात्र संबधितांना पुढील पंधरा दिवसाकरीता आपआपल्या घरातच थांबण्याच्या लेखी सुचना दिल्या आहेत. तसेच इतरांशी संपर्क टाळण्याबाबत सांगितले आहे. त्यांचेवर होम कोरेटांईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली येथून आलेले ३ व नेपाळ वरून आलेला १ अश्या ४ जनांना पुणे येथील नायडू रूग्णालयात पाठवण्यात येणार आहे. दिल्ली अथवा परदेशातून कोणी आले असेल तर त्यांनी आरोग्य केंद्रात येवून तपासणी करून घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे.
निजामुद्दीन कार्यक्रमातील सहभागी तिघांसह कदमवाकवस्ती परिसरात ७ जण होम क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 3:39 PM
चेन्नई येथून ३ तर नेपाळ येथून आलेल्या एकाचा समावेश
ठळक मुद्दे७ नागरिकांमध्ये सध्या तरी कोरोनाची लक्षणे आढळुन आलेली नाहीत.