लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गजानन मारणे टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केल्यानंतर आता नीलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर आली आहे. चॉपरचा धाक दाखवून रॅलीसाठी जबरदस्तीने जीप घेऊन जाणाऱ्या घायवळ टोळीतील ८ जणांवर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे, तर दोघांना अटक केली आहे.
संतोष आनंद धुमाळ (वय ३८, रा. भूगाव, ता. मुळशी) आणि मुसाब ऊर्फ मुसा इलाही शेख (वय २९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका गॅरेज व्यावसायिक व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे भुसारी कॉलनी येथील गॅरेजमध्ये काम करत होते. त्या वेळी नीलेश घायवळ टोळीतील संतोष धुमाळ याच्या सांगण्यावरून कुणाल कंधारे, मुसाबा इलाही शेख, अक्षय गोगावले, विपुल माझिरे व इतर ३ अशा ८ जणांनी फिर्यादी यांना चॉपरचा धाक दाखवून त्यांची जीप जबरदस्तीने चोरून नेली. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.