लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : रात्री पावणेअकराच्या दरम्यान ‘एक हात मदतीचा’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘आपला नीलेश गेला’ असा योगेश ढगे यांचा मेसेज आला... आणि नीलेशच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करणाऱ्या त्याच्या वर्गमित्रांच्या अश्रूंचा बांध फुटला. तब्बल अकरा दिवस मृत्यूशी चाललेली नीलेशची झुंज थांबली. २९ एप्रिलला पुणे-अहमदनगर रस्त्यावर प्रणय गावंड याच्या लग्नाच्या पत्रिका वाटत असताना, नीलेश खरात (रा. कळंबोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि प्रणय गावंड यांचा अपघात झाला होता. या अपघातात प्रणयचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी अवस्थेत नीलेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी रात्री ९.४५ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूसमयी नीलेशचे वडील, बहीण, मित्र योगेश ढगे, कुलदीप सूर्यवंशी, मेघनाथ आवटे, ससून रुग्णालयात हजर होते. ‘आपला नील्या गेला’ हे कळताच त्यांना अश्रू अनावर झाले. नीलेशच्या मृत्यूची बातमी समजताच वालचंदनगर, कळंब, कळंबोली परिसरावर शोककळा पसरली. बुधवारी (दि. १०) त्याच्यावर कळंबोली (ता. माळशिरस) या त्याच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीतून शिकून नीलेश देहू येथील संत तुकाराम महाविद्यालयात विनाअनुदानित तत्त्वावार शिक्षक म्हणून रूजू झाला होता. मात्र गंभीर अपघाताने त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार हिरावून घेतला आहे. नीलेशच्या उपचारासाठी जमा केलेली रक्कम त्याच्या कुटुंबाला मदत म्हणून देण्यात येणार आहे.
नीलेशची मृत्यूशी झुंज अखेर थांबली!
By admin | Published: May 12, 2017 4:54 AM