दावडी : निमगाव-दावडी रस्त्यातील खड्डे व दोन्हीकडेच्या साईडपट्ट्या खचल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना नेहमीच अपघातांचा सामना करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे निमगाव ते दावडी या ४ किलोमीटरच्या रस्त्याची वाट लागली आहे. रस्ता पार खचून गेला आहे. येथील रस्त्यांना खड्डे पडले असून, या मार्गावरुन प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पूर्वी हा रस्ता पार करण्यासाठी जेमतेम ५ मिनिटे लागायचे. मात्र आता १५ मिनटे लागतात. रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे, खचलेल्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.हा रस्ता पुढे शेलपिंपळगावमध्ये चाकण-शिक्रापूर या महामार्गाला जोडण्यात आला असल्याने प्रवासाची वेळ वाचविण्यासाठी अनेक जण याच मार्गाचा वापर करतात. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. यामुळे लोकांना नाईलाजाने रस्त्यातील खड्ड्यांमधून वाट काढत जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार केल्यानंतर मुरूम व माती टाकून काही खड्डे बुजविण्यात आले. परंतु पावसामुळे खड्डे भरलेल्या ठिकाणी खूप चिखल झाला. त्यावरून दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे.दावडी येथे महालक्ष्मी देवीच्या मंदिरामागून जाणाºया ओढ्यालगत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मोरी ओढ्यालगत असल्याने ओढ्याला पूर आल्यावर रस्त्यावर पाणी येते. रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. या मोरीजवळही रस्ता खचून तो अंरुद बनला आहे. हे ठिकाण अपघाताला निमंत्रण देणारे आहे. एखादा जीव गेल्यावरच प्रशासन याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिक संतापाने विचारत आहेत.आळेफाटा परिसरात रस्त्याची दुरवस्थाआळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आळेफाटा परिसरातील रस्त्यांवर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरून कोणत्याही प्रकारचे वाहन चालविताना वाहनचालकांची त्रेधातिरपट उडत आहे. संबंधित यंत्रणांकडे खड्ड्यांविरोधात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा बुलंद छावा संघटनेचे विजय देवकर यांनी दिला आहे.
निमगाव-दावडी रस्त्याची चाळण; अपघातांचे प्रमाण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 2:17 AM