पुणे : कॅन्टोन्मेंटमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विवेक यादव यांना दरमहा एक लाख रुपये देण्याची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड नीलेश घायवळ (वय ४२, रा. शस्त्रीनगर, कोथरूड) व सागर सोनबा जोगावडे (वय २८, रा. कोथरूड) याला अटक केली आहे. घायवळ फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित कायद्यातून (मोक्का) जामिनावर बाहेर आला होता.या प्रकरणी यादव यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिक कपिल मुथा याला यादव याने ५ लाख रुपये उसने दिले होते. ही रक्कम परत द्यावी, यासाठी यादव मुथा याच्याकडे तगादा लावत होते. मुथा याने घायवळ याच्याशी संपर्क साधला. घायवळ याने यादव यांना फोन करून मुथाकडून पैसे न घेण्यास बजावले. तसेच, ‘तू सध्या खूप पैसे कमावत आहे. त्यामुळे महिना एक लाख रुपये दे’ अशी धमकी दिली. एका नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घायवळ आणि यादव उपस्थित होते. त्या वेळी यादव याने घायवळला भेटण्यास नकार दिला होता. पुढे मुथा याच्याकडून पैसे मागू नये व लाखाच्या खंडणीची मागणी केली.दरम्यान, यादव यांनी घायवळच्या नावे शिवीगाळ केल्याचे समजल्याने घायवळच्या टोळीतील सागर जोगावडे याने यादव आॅफिसमधील दीपक सूयर्वंशी याला समज दिली.ढोले-पाटील रस्त्यावरील इथनोशिया, एमक्यूब येथे १२ नोव्हेंबर रोजी यादव येणार असल्याचे घायवळला समजले होते. त्याच्यासह पंधरा-वीस जण हॉटेल परिसरात गेले. जोगावडे याच्यासह पंधरा-वीस जणांनी यादव कोठे आहे, याची विचारणा केली.हॉटेलमधील व्यक्तीने माहीत नसल्याचे सांगितल्याने, त्याला मारहाण केली. तसेच, हॉटेलच्या गल्ल्यातून १३ हजार ८०० रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी घायवळ याच्यासह १५ ते २० जणांविरोधात विकी रवाणी याने कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यादव यांनी गुन्हे शाखेतील अधिकाºयांशी चर्चा करून बुधवारी गुन्हा दाखल केला.या दोघांना गुरुवारी अटक करून लष्कर न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यादव यांच्यावर दीड वर्षापूर्वी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये गोळबार झाला होता तेव्हापासून त्यांना पोलीस संरक्षण आहे.
कुख्यात गुंड नीलेश घायवळला अटक :नगरसेवकाला मागितली दरमहा लाखाची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 5:57 AM